बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रीडाप्रेमींना चर्चेसाठी आणखी एक विषय उपलब्ध करुन दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत असताना संदीप पाटील यांनी, वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा सरस फलंदाज असल्याचं वक्तव्य केलं आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत रोहितने इंदूरच्या मैदानात शतकी खेळी केली, तर वन-डे मालिकेत रोहितने आपल्या कारकिर्दीतलं तिसरं द्विशतक झळकावलं.

अवश्य वाचा – रोहित शर्माच्या ‘हिटमॅन’ नावामागची कहाणी माहिती आहे??

“विराटचे चाहते कदाचीत माझ्यावर नाराज होतील, पण सध्याच्या घडीला रोहित शर्मा वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे.” ABP News या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटील बोलत होते. ” विराटच्या फलंदाजीबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. तो एक चांगला फलंदाज आहे यात वादच नाही. कसोटी क्रिकेटमध्ये विराट सध्याच्या घडीला भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र जेव्हा आपण वन-डे आणि टी-२० सामन्यांचा विचार करतो, तेव्हा विराटपेक्षा रोहित शर्मा हा अधिक चांगला फलंदाज ठरतो.”

ज्या वेळी रोहित शर्माला संधी मिळाली त्यावेळी त्याने संधीचं सोनं केलं आहे. श्रीलंकेविरुद्ध रोहितचा मैदानातला फॉर्म हा अविश्वसनीय होता. कदाचीत रोहित हा श्रीलंकेविरुद्ध खेळत असल्याने त्याने एवढी चांगली कामगिरी केली असं काही लोकांचं म्हणणं असू शकत, मात्र रोहितला ज्यावेळा संधी मिळाली आहे त्यावेळा त्याने संघासाठी आपलं १०० टक्के योगदान दिलं असल्याचं पाटील म्हणाले.

अवश्य वाचा – Blog: देशातले शेर, परदेशात सव्वाशेर ठरतील?

विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करताना रोहित शर्माने वन-डे मालिकेत भारताला २-१ आणि टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला. याचसोबत श्रीलंकेविरुद्ध सलामीला फलंदाजीसाठी येत त्याने स्फोटक फलंदाजी करत आपलं ‘हिटमॅन’ हे टोपणनाव अधिक प्रखरपणे सिद्ध केलं. यानंतर भारतीय संघाचा ५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात रोहित शर्मा कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader