Karachi Kings vs Lahore Qalandar: पाकिस्तान सुपर लीग २०२३ चा आठवा सामना अतिशय शानदार झाला. या सामन्यात कराची किंग्जने लाहोर कलंदरवर ६७ धावांनी मोठा विजय नोंदवला. कराचीकडून मॅथ्यू वेड, जेम्स विन्स आणि कर्णधार इमाद वसीम यांनी शानदार खेळी खेळली. लाहोर कलंदरने भलेही सामना गमावला असेल, परंतु त्यांच्या एका युवा वेगवान गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करून सर्वांची मने जिंकली.
आम्ही बोलत आहोत जमान खानबद्दल. हा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या शैलीत गोलंदाजी करतो. जमान खानने इंग्लंडचा स्टार खेळाडू जेम्स विन्सला मलिंगा स्टाईलने यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड केले. सामन्यादरम्यान जमान आपल्या संघासाठी १४ वे षटक घेऊन आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने यॉर्क लेन्थवर चेंडू टाकला, ज्यावर फलंदाज जेम्स विन्सने चकवा खाल्ला आणि क्लीन बोल्ड झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलिंगाच्या स्टाईलने गोलंदाजी करणारा जमान खान कोण आहे?
जमान खान हा पाकिस्तानचा नवोदीत खेळाडू आहे. त्यांचा जन्म मीरपूर येथे झाला. हा २१ वर्षीय गोलंदाज श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या शैलीत गोलंदाजी करत आहे. जमान खान पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
कराची किंग्स विरुद्ध लाहोर कलंदर सामन्याची संपूर्ण स्थिती –
पाकिस्तान सुपर लीग २०२३ चा आठवा सामना कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लाहोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कराची किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या, या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना लाहोर कलंदर संघ १७.३ षटकांत ११८ धावांवर गारद झाला. त्यामुळे त्यांना सामना ६७ धावांनी गमवावा लागला.