कर्णधार विराट कोहलीने आणखी एका दमदार शतकानिशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा अध्याय लिहिला. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमाचा वापर करावा लागला. त्यानुसार बंगळुरूने आयपीएल गुणतालिकेतील तळ्याच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
डाव्या हाताला झालेल्या दुखापतीची पर्वा न करता कोहलीने यंदाच्या आयपीएलमधील चौथे शतक साकारले आणि एका हंगामात आठशेहून अधिक धावा काढणारा तो पहिला फलंदाज ठरला. १३ सामन्यांत त्याच्या खात्यावर ८६५ धावा जमा आहेत. कोहलीने ५० चेंडूंत १२ चौकार आणि ८ षटकारांसह ११३ धावा केल्या. याशिवाय ख्रिस गेल (७३) सोबत त्याने १४७ धावांची सलामीची भागीदारी केली. त्यामुळे बंगळुरूला १५ षटकांत ३ बाद
२११ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पावसामुळे हा सामना आधी १५ षटकांचा करण्यात आला.
मग बंगळुरूने पंजाबला १४ षटकांत १२० धावांवर रोखले आणि स्पध्रेतील सातव्या विजयाची नोंद केली. पंजाबकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक २४ धावा केल्या. तर बंगळुरूचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने २५ धावांत ४ बळी घेतले. श्रीनाथ अरविंद आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बंगळुरूने आता १३ सामन्यांत १४ गुण कमवले आहे. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्या खात्यावरसुद्धा इतकेच गुण आहेत. दरम्यान यंदाच्या हंगामात १३ पैकी केवळ चार सामन्यात विजय मिळवल्याने पंजाबच्या बाद फेरीत आगेकूच करण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गेल्यावर्षीही गुणतालिकेत त्यांना शेवटचे स्थान मिळाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा