India vs West Indies 1st ODI Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वन डेच्या आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना बार्बाडोस येथे गुरुवारी (२७ जुलै) होणार आहे. पावसामुळे टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करू शकली नाही. पण रोहित शर्माची टीम वन डे मालिकेत ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल. कसोटीप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. विंडीजने शेवटची वन डे मालिका २००६ मध्ये भारताविरुद्ध जिंकली होती. त्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध सलग १२ एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता त्याचे लक्ष्य सलग १३वी वन डे मालिका असेल.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ही मालिका संघ बांधणीसाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषत: सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. पहिल्याच चेंडूवर सलग तीनवेळा बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला होता. त्यामुळे या मालिकेत स्वतःला सिद्ध करण्याची कोणतीही कसर तो सोडणार नाही.
सूर्यकुमारने टी२० मध्ये आपला जबरदस्त फॉर्म नक्कीच दाखवला आहे, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश आतापर्यंत तरी मिळालेले नाही. या मालिकेत त्याला श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत मोठी खेळी खेळून चौथ्या क्रमांकाचे स्थान निश्चित करायला आवडेल. केवळ सूर्यकुमारच नाही तर इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि उमरान मलिक यांच्यावरही या मालिकेत लक्ष असणार आहे.
संजू सॅमसनही दावा करणार आहे
रिहॅबमधून जात असलेला के.एल. राहुल विश्वचषकात खेळणार का? याबाबत काहीही अपडेट आलेले नाहीत. मात्र, तरीही त्याचे नाव नंबर वन यष्टिरक्षकाच्या यादीत दिसून येत आहे. परंतु त्याच्या अनुपस्थितीत, इशान किशन आणि संजू सॅमसन देखील या मालिकेद्वारे आपला दावा ठोकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. ऋषभ पंतचेही जरी पुनर्वसन होत असले तरी विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा नाही. सॅमसन सतत त्याच्या परफॉरमन्समुळे एकदिवसीय संघात येत जात असतो. त्याच्या ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण सरासरी ६६ आहे.
इशानला विकेटकीपिंगमध्ये प्राधान्य मिळेल
कसोटी मालिकेत विकेटकीपिंग आणि फलंदाजीत आपल्या कामगिरीने प्रभावित करणारा इशान किशन पहिल्या एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीच्या भूमिकेत असतील. याचाच अर्थ ऋतुराज गायकवाडला आणखी काही काळ बाहेर बसावे लागू शकते. आयपीएलपासून न खेळलेल्या हार्दिक पांड्यासाठी इथून पुढे हा हंगाम कठीण जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर त्याला पाच सामन्यांच्या टी२० मालिकेचे नेतृत्व करावे लागेल. अशा परिस्थितीत, असे देखील होऊ शकते की, तो तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही.
कुलदीप-चहलही खेळण्याचा दावा करतात
उमरान मलिकने गोलंदाजीत नक्कीच जास्त धावा दिल्या आहेत, पण तो विकेटही घेत आहे. त्याने आतापर्यंत सात सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलला एकदिवसीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. चहल आणि कुलदीप यादव यांना एकत्र एकाच सामन्यात संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाजीत त्यांचा फॉर्म पुढे सुरु ठेवू शकतात. संघ व्यवस्थापनाने मोहम्मद सिराजला मालिकेपूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तो घरी परतला आहे.
वेस्ट इंडिजकडे गमावण्यासारखे काही नाही
वेस्ट इंडिजकडे आता गमावण्यासारखे काही नाही. त्यांचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकलेला नाही. शिमरॉन हेटमायर आणि ओशाने थॉमसच्या पुनरागमनानंतर वेस्ट इंडिज आव्हान देऊ शकते. मात्र, त्याला निकोलस पूरन आणि जेसन होल्डरची साथ मिळणार नाही. संघाचे नेतृत्व शाई होपकडे असेल.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
वेस्ट इंडीज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, ओशाने थॉमस, जेडेन सील्स/यानिक कारिया.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन/संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार.