कोलकाता : भारतीय फुटबॉल संघ तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीला विजयी निरोप देण्यात अपयशी ठरला. कुवेतविरुद्ध गुरुवारी झालेल्या ‘फिफा’ विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सामन्यात भारताला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.
भारतीय संघाला हा सामना जिंकून छेत्रीला संस्मरणीय निरोप देण्यासह विश्वचषक पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र, या दोनही आघाड्यांवर भारतीय संघाने निराशा केली. भारताचे आता पाच गुण झाले आहे. भारत आपला अखेरचा सामना ११ जूनला आशियाई विजेत्या कतारविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा >>>खेळपट्टीबाबत संभ्रमच! अंदाज बांधणे अवघड असल्याचे रोहितचे मत; माजी क्रिकेटपटूंकडूनही टीका
भारतीय फुटबॉलमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या ३९ वर्षीय छेत्रीने या सामन्यानंतर १९ वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. त्याने भारताकडून विक्रमी ९४ गोल केले. छेत्रीला निरोप देण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय, अधिकारी आणि माजी खेळाडूही उपस्थित होते. भारतीय संघाकडून छेत्रीला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यावेळी छेत्रीचे डोळे पाणावलेले होते. तसेच मैदानाबाहेर पडतानाही तो भावूक झाला.