India’s first innings in the second Test : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील भारतचा पहिलाय डाव शनिवारी सकाळी आटोपला. भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक २०९ धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
३४ धावा करणारा शुबमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली. भारताचे शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आता पुढल्या सामन्यात या दोघांनाही संघातून वगळले जाऊ शकते. तिसऱ्या कसोटीसाठी संघनिवड अजून व्हायची आहे. विराट कोहली संघात परतला तर श्रेयस अय्यर टीम इंडियातून बाहेर पडू शकतो. त्याचवेळी राहुलही फिट झाल्यास शुबमन गिललाही संघातून वगळले जाऊ शकते.
भारतीय संघाच्या पहिल्या डावात स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच भारताची एक बाजू लावून धरली. यशस्वी जैस्वालला इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून फार काळ साथ मिळाली नाही, तरीही त्याने सर्व फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वाच्या भागीदारी केल्या.
पहिल्या डावात यशस्वी फलंदाजी करताना कोणताही इंग्लिश गोलंदाज त्याच्याविरुद्ध प्रभावी दिसला नाही. इंग्लंडचा प्रत्येक गोलंदाज यशस्वीसमोर असहाय्य दिसत होता. यशस्वीने २९० चेंडूंचा सामना करताना २०९ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि ७ षटकार आले. यशस्वी जैस्वालची विकेट पहिल्या डावात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने घेतली. त्याने जैस्वालला बेअरस्टोकरवी झेलबाद केले.
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालने झळकावलं पहिलं द्विशतक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय खेळाडू
जेम्स अँडरसनने घेतल्या तीन विकेट्स –
इंग्लंडबद्दल बोलायचे झाले, तर या सामन्यात त्यांच्या बाजूने सर्वात यशस्वी आणि किफायतशीर गोलंदाज ४१ वर्षीय जेम्स अँडरसन होता. त्याने आपला सर्व अनुभव भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजीत पणाला लावला. याचा पुरेपूर फायदा अँडरसनलाही झाला. या डावात त्याने २५ षटके टाकली, ज्यामध्ये त्याने ४ निर्धाव षटकं टाकताना केवळ ४७ धावा दिल्या. भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने शुबमन गिल, आर अश्विन आणि यशस्वी जैस्वाल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.