पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. या सामन्यात आकाशदीप सिंगची हॅट्ट्रिकही भारतीय पुरुष हॉकी संघासाठी व्यर्थ गेली. कारण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा शेवटच्या क्षणी ४-५ अशा फरकाने पराभव झाला. आकाशदीप सिंगने (१०, २७ आणि ५९ व्या मिनिटाला) तीन गोल केले तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने (३१व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरित केले.
ऑस्ट्रेलियाकडून लचलान शार्प (५व्या), नॅथन इफ्राम्स (२१व्या), टॉम क्रेग (४१ व्या) आणि ब्लेक गोव्हर्स (५७ आणि ६० व्या) यांनी गोल केले.सामना संपण्याच्या दोन मिनिटे अगोदर भारत ४-३ ने पिछाडीवर होता. आकाशदीपने ५९व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला, मात्र यादरम्यान दोन पेनल्टी हरमनप्रीतच्या संघाला महागात पडल्या.
गोव्हर्सचा पहिला पेनल्टी चुकला, पण दुसऱ्या पेनल्टीवर त्याने आपला ११८ वा गोल केला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे.
भारतीय संघ –
गोलरक्षक: कृष्ण बहादूर पाठक, श्रीजेश परत्तू रवींद्रन
बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीव अॅक्सेस, वरुण कुमार
मिडफिल्डर: सुमित, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, मोहम्मद. राहिल मौसेन, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग
फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग