भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात खेळपट्टीवर काही प्रमाणात हिरवळ कायम ठेवण्यात आल्याचे अ‍ॅडलेडचे क्युरेटर डॅमियन हॉग यांनी म्हटले आहे. हा जरी दिवसा खेळला जाणारा कसोटी सामना असला तरी यापूर्वीच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांप्रमाणेच खेळपट्टी ठेवण्याचा मानस असल्याचे हॉग यांनी नमूद केले.

दिवस-रात्र कसोटी सामन्यातील गुलाबी चेंडूसाठी जशा प्रकारची खेळपट्टी तयार केली होती, तशीच खेळपट्टी या लाल चेंडूवर दिवसा होणाऱ्या सामन्यासाठी केली जाणार आहे. त्यापेक्षा कोणताही वेगळा बदल करण्याची गरज आहे, असे वाटत नाही. केवळ एकमेव बदल म्हणजे, आम्ही खेळपट्टीवरचे आच्छादन लवकर काढून त्यावर अधिक लवकर कामाला सुरुवात करणार असल्याचे हॉग यांनी सांगितले.

खेळपट्टीवर थोडेसे हिरवे गवत राखल्याने फलंदाज आणि गोलंदाज अशा दोघांनाही त्याचा लाभ उठवण्याची समान संधी मिळते. यापूर्वी अ‍ॅडलेडमध्ये झालेला दिवस-रात्रीचा पहिला कसोटी सामना तीन दिवसांत तर दुसरा सामना चार दिवसांमध्ये संपुष्टात आला होता. तर तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत चालला होता. क्युरेटरने जर अधिक हिरवळ राखली तर त्याचा फायदा पहिल्या सत्रात गोलंदाजी करणाऱ्या जलदगती गोलंदाजांना अधिक प्रमाणात मिळू शकणार आहे. तसेच सामन्यात जलदगती गोलंदाजांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader