West Indies won the toss and decided to bat: भारतीय क्रिकेट संघ बुधवारी (१२ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे सुरु होणार आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघान फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यशस्वी जैस्वालला मिळाली कसोटी पदार्पणाची कॅप –
या पहिल्या सामन्यासाठी आता दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारतीय संघाकडून युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या सामन्यातून यशस्वी जैस्वाल कसोटी पदार्पण करणार आहे. त्याला कसोटी कॅप देण्यात आली आहे. यशस्वीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आणि मुंबईसाठी देशांतर्गत सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचबरोबर इशान किशनलाही पदापर्णाची संधी मिळाली आहे.
२००२ पासून भारताने वेस्ट इंडिजमध्ये एकही कसोटी गमावलेली नाही –
भारत १२ वर्षांनंतर डॉमिनिका येथे कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर शेवटचा सामना २०११ मध्ये अनिर्णित राहिला होता. टीम इंडियाला आतापर्यंत येथे फक्त एकच सामना खेळता आला आहे. त्यामुळे त्यांची ही दुसरी कसोटी असेल. २००२ पासून भारताने वेस्ट इंडिजमध्ये एकही कसोटी गमावलेली नाही. हा क्रम पुढे चालू ठेवण्यासाठीच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल. टीम इंडियाचा शेवटचा पराभव २००२ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने सहा कसोटी जिंकल्या असून सात अनिर्णित राहिल्या आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन