बांगलादेश येथील सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील आजच्या सामन्यात दुबळ्या थायलंड संघाने पाकिस्तानवर ४ गडी राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात थायलंड संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे. थायलंडने या सामन्यात उत्कृष्ट खेळ करत पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच थायलंडने पाकिस्तानला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मात दिली. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ हिने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना एकतर्फी होणार अशा चर्चा सुरू असतानाच मुनीबा अली १५ धावा करताच बाद झाली, तर अमीन हीच्या अर्धशतकाच्या बळावर पाकिस्तानने २० षटकात ५ गडी गमावत ११६ धावा केल्या.
पाकिस्तान विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवण्यात महत्त्वाचा वाटा हा थायलंडची सलामीवीर नत्थाकन चँथमचा आहे. तिने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तिच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने २०चा आकडा पार केला नाही. नन्नापत कोंचरोएंकाईने १३ आणि कर्णधार नरुमोल चायवाईने १७ धावा केल्या.
या लढतीतील शेवटच्या षटकात थायलंडला जिंकण्यासाठी १० धावांची आवश्यकता होती. तेव्हा चेंडू पाकिस्तानची अनुभवी गोलंदाज डायना बेगच्या हातात होता. तिने दुसरा चेंडू फुलटॉस टाकल्याने थायलंडच्या रोसीनन ने चौकार ठोकला. नंतर पुढच्या तीन चेंडूवर थायलंडने चार धावा करत सामना आपल्या नावे केला आहे. त्यांनी एक चेंडू आणि ४ गडी शिल्लक राखत सामना जिंकला आहे.
थायलंडच्या या विजयाने गुणतालिकेत थोडे बदल झाले आहेत. सामना जिंकून त्यांनी २ गुण मिळवले असून पुढचे सर्व सामने जिंकले तर पाकिस्तानला ते बाहेर काढू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना पुढील सामना खूप मोठ्या फरकाने जिंकवा लागेल तसे करणे त्यांच्यासाठी थोडे अवघड आहे. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना ७ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. त्याच दिवशी थायलंड संयुक्त अरब अमिराती यांच्याशी दोन हात करणार आहेत.