Zaka Ashraf Rejects Asia Cup Hybrid Model: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पुढील अध्यक्ष झका अश्रफ यांनी आशिया कप २०२३ चे हायब्रीड मॉडेल येताच नाकारले आहे. आशिया चषक पाकिस्तानातच होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी ते २०११ मध्ये पीसीबीचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१२ मध्ये ते आशियाई क्रिकेट परिषदेच्या विकास समितीचे अध्यक्ष बनले होते.
झका अश्रफ पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधित आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. अश्रफ यांनी कॅडेट कॉलेज पेटारो येथून शिक्षण पूर्ण केले आहे. २०१३ मध्ये, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अशरफ यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे सांगत त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवले होते. त्यावेळी नजम सेठी हे कार्यवाह अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र एक वर्षानंतर अश्रफ यांची पुन्हा अध्यक्षपदासाठी निवड झाली.
झका अश्रफ का आहेत चर्चेत?
झका अश्रफ अद्याप पीसीबीचे अध्यक्ष बनलेले नाहीत. पण अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ते पुढील अध्यक्ष होऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे. आशिया कप २०२३ चे हायब्रीड मॉडेल येताच झका अश्रफ यांनी नाकारले आहे. अश्रफ पत्रकार परिषदेत म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे मी आशिया चषकाचे हायब्रीड मॉडेल नाकारले आहे. मला हे अजिबात पटत नाही. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा पाकिस्तानातच व्हावी, असे ठरवले असेल, तर तसेच व्हायला हवे.”
हेही वाचा – Ashes Series 2023: ऑली रॉबिन्सनवर रिकी पाँटिंग संतापला; म्हणाला, “१५ वर्षांपूर्वी मी काय केले याची त्याला…”
पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने होणार –
आशिया चषक स्पर्धेबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद पूर्णपणे मिटलेला नाही. ही स्पर्धा आता दोन देशांमध्ये आयोजित केले जाणार आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकाच्या या हंगामात दोन गट असतील. यावेळी आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तामध्ये जाण्यास नकार दिला. या कारणासाठी, हायब्रीड मॉडेल निवडले आहे. ३१ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.