भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून पायउतार होण्यासाठी एन. श्रीनिवासन यांच्यावरील दडपण वाढत आहे. आयपीएल सट्टेबाजी आणि फिक्सिंग संदर्भातील चौकशी नि:पक्षपाती व्हावी, याकरिता सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकांनी समर्थन केले आहे. बीसीसीआयच्या तीन उपाध्यक्षांनीही या सूचनेचा आदर केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा आदर राखून श्रीनिवासन यांनी पायउतार व्हावे, असे बीसीसीआयचे पाचपैकी तीन उपाध्यक्ष शिवलाल यादव, रवी सावंत आणि चित्रक मित्रा यांनी म्हटले आहे.
‘सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी दक्षिण विभागाचा कार्यकाळ सुरू आहे. त्यामुळे यादव यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. वडिलांच्या निधनामुळे एकदा श्रीनिवासन बैठकीला हजर राहू शकले नव्हते, तेव्हा यादव यांच्या अध्यक्षतेखालीच सभा झाली होती,’’ असे मित्रा यांनी सांगितले. तथापि, या परिस्थितीत मी कोणतीही जबाबदारी सांभाळण्यासाठी तत्पर आहे, असे यादव यांनी सांगितले.

श्रीनिवासन नाटय़

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी जावई गुरुनाथ मयप्पन यांचे नाव आल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी पदभार सोडला.
त्यांच्या अनुपस्थितीत जगमोहन दालमिया यांनी प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
सप्टेंबर २०१३मध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांची अध्यक्षपदी पुनर्निवड.
सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी सखोल तपासाकरिता सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली.
फिक्सिंगप्रकरणी तपासासाठी बीसीसीआयने नेमलेल्या द्विसदस्यीय समितीने श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा व्यवस्थापक गुरुनाथ मयप्पन याला निर्दोष ठरवले होते. समितीच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते

तीन उपाध्यक्षांसहित माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकांचा दबाव

‘या प्रकरणाची योग्य चौकशी होण्यासाठी श्रीनिवासन यांनी पदावरून पायउतार व्हावे. आम्हाला लोकांची प्रतिमा डागाळण्याची इच्छा नाही. परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष जोपर्यंत पद सोडत नाही, तोपर्यंत नि:पक्षपाती चौकशी होणार नाही. ते पदाला का चिकटून राहिले आहेत? हे घृणास्पद आहे. जर तुम्ही पद सोडणार नसाल, तर आम्ही तसे आदेश जारी करू!’’
सर्वोच्च न्यायालय

आयपीएल प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी श्रीनिवासन यांनी पदावरून पायउतार व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर त्यांनी पद सोडले नाही, तर सर्वोच्च न्यायालय २७ मार्चला आदेश जारी करेल. या सुनावणीत सर्व काही आहे.
चित्रक मित्रा, बीसीसीआयचे उपाध्यक्ष (पूर्व विभाग)

सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचे असे म्हणणे असेल तर आपण काहीच करू शकत नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना पायउतार व्हायला सांगितले असेल, तर दोन दिवसांत त्यांनी पद सोडायला हवे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेबाबत कार्यकारिणी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
रवी सावंत, बीसीसीआयचे उपाध्यक्ष (पश्चिम विभाग)

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. कोणीही त्याचा अवमान करू शकत नाही. सर्वाना त्याचे पालन करायलाच हवे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असल्याने त्यावर मत प्रदर्शित करण्याचा प्रश्नच नाही. बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करायला हवा.
शिवलाल यादव, बीसीसीआय उपाध्यक्ष (दक्षिण विभाग)

बीसीसीआयच्या कारभारातील हा सगळ्यात मानहानीकारक क्षण आहे. क्रिकेट संदर्भातील सर्व पदे श्रीनिवासन यांनी सोडायला हवीत. क्रिकेट या खेळातील गैरप्रकारांचा नायनाट व्हावा, यासाठी न्यायाधीश मुदगल यांच्या समितीचा अहवाल अचूक वेळी मांडण्यात आला आहे.
बिशनसिंग बेदी, माजी खेळाडू

खेळ हा विशिष्ट व्यक्तीपेक्षा मोठा आहे आणि त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या हितासाठी श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरून बाजूला व्हावे. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा.
मोहिंदर अमरनाथ, माजी खेळाडू

सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना पदावरून बाजूला होण्यास सांगितले आहे. याबाबत मी आनंदी आहे. बीसीसीआय अध्यक्षपदावर कार्यरत राहणे, हा श्रीनिवासन यांच्या उद्धट वर्तनाचा उत्तम नमुना आहे.
किशोर रुंगटा, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष

 

 

Story img Loader