India A vs Pakistan A Emerging Asia Cup Final 2023: पुरुषांच्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत अ संघाचा पाकिस्तान अ संघाशी सामना होत आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो टीम इंडियाला महागात पडला. पाकिस्तान अ संघाने ५० षटकांत ८ बाद ३५२ धावा केल्या. भारत अ संघाला विजयासाठी ३५३ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इमर्जिंग आशिया कप मधील भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७च्या अंतिम सामन्याची क्रिकेट चाहत्यांना आठवण झाली. या सामन्यात पाकिस्तान अ संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी शानदार भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानला चांगली सुरुवात मिळाली. पण भारत अ संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरने सलामीवीर सॅम अयुबला टाकलेल्या नो-बॉलने चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मधील जसप्रीत बुमराहच्या नो-बॉलची आठवण करून दिली. ज्यामध्ये पाकिस्तानी फलंदाजाला जीवदान मिळाल्यानंतर सामन्याचा दृष्टिकोन बदलला.

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामन्यात राज्यवर्धन हंगरगेकर चौथे षटक टाकत होता. त्या षटकातील शेवटचा चेंडू त्याने पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अय्युबला टाकला. १७ धावांवर फलंदाजी करणाऱ्या सॅमच्या बॅटला चेंडू बाहेरच्या बाजूला लागला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आऊटसाठी जोरदार अपील केले. पण रिप्लेमध्ये राज्यवर्धनचा पाय लाईनच्या बाहेर जाताना दिसला. त्यानंतर या चेंडूला नो बॉल देण्यात आला आणि सॅमला जीवदान मिळाले. यानंतर सॅमने त्याच्या सलामीच्या फलंदाजासह शानदार शतकी भागीदारी केली.

राज्यवर्धनच्या या चेंडूवर क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७च्या अंतिम सामन्याची आठवण झाली. ज्यामध्ये विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानला गोलंदाजी करत होता. त्याने चेंडू टाकला आणि फखरच्या बॅटची कड घेऊन तो थेट यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात गेला. पण रिप्लेच्या वेळी तो चेंडू नो बॉल देण्यात आला तसाच प्रकार हंगरगेकरच्या बाबतीत झाला. यानंतर फखर जमान आणि अझहर अली यांनी १२८ धावांची सलामी दिली. अंतिम सामन्यात भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.

दोन चेंडूत सलग दोन विकेट्स घेतल्या

उल्लेखनीय म्हणजे, स्टार अष्टपैलू रियान परागने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात २७ षटकांत सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने स्वतः एक शानदार झेल घेतला आहे. २७ षटकांच्या पहिल्या चेंडूवर उमेर युसूफला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कासिम अक्रम बाद झाला.

हेही वाचा: IND vs WI: “माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे…”, इशान, शुबमन आणि जैस्वाल यांची ‘मिस वर्ल्ड’सोबत खास भेट, पाहा Video

भारताला मोठे लक्ष्य मिळाले

पाकिस्तान संघाने भारताला सामना जिंकण्याचे मोठे लक्ष्य दिले आहे. त्याने ५० षटकांत आठ गडी बाद ३५२ धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी ३५३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पाकिस्तानकडून तैयब ताहिरने सर्वाधिक १०८ धावा केल्या. साहिबजादा फरहानने ६५ आणि सॅम अयुबने ५९ धावा केल्या. ओमेर युसूफ आणि मुबासिर खान यांनी ३५-३५ धावांचे योगदान दिले. मोहम्मद वसीम ज्युनियर १७ धावा करून नाबाद राहिला. मेहरान मुमताजने १३ धावा केल्या. मोहम्मद हारिस दोन धावा करून बाद झाला. कासिम अक्रम खातेही उघडू शकला नाही. सुफियान मुकीमने नाबाद चार धावा केल्या. भारत अ संघाकडून राजवर्धन हंगरगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind a vs pak a a repeat of bumrahs time hungergekars no ball and fans in tension a target of 353 runs ahead of india avw