Rohit Sharma funny video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्रिनिदादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमानांना विजयासाठी एकूण २८९ धावांची गरज आहे. त्याचवेळी, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा सुपडा साफ करण्यासाठी टीम इंडियाला आज अजून आठ विकेट्स घ्याव्या लागतील. दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो खिडकीतून काहीतरी बघताना दिसत आहे. हिटमॅनच्या या व्हिडीओवर लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वास्तविक, व्हायरल व्हिडीओमध्ये रोहित क्वीन्स पार्क स्टेडियमच्या खिडकीतून काहीतरी पाहत आहे. टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असतानाचं हे दृश्य आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माचे केस विस्कटलेले असून तो नुकताच झोपेतून उठल्यासारखे दिसत आहे. चाहते व्हिडिओवर खूप मजेशीर कमेंट्स करत आहेत आणि सध्या यावर त्याचे खूप मीम्स देखील व्हायरल होऊ लागले आहेत.
रोहित शर्माचा एक व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. क्वीन्स पार्क स्टेडियमच्या खिडकीतून रोहित काहीतरी पाहत आहे. भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या डावात खेळत असतानाचा हा व्हिडीओ आहे. एका यूजरने कूल रोहित शर्माला लिहिले, “तुम्ही त्याची स्तुती करा किंवा टीका करा. खरं तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वेस्ट इंडिजचा अभिमान आहे, पण अनेक यूजर्स यावर रोहितला टार्गेट करत आहेत. त्यांच्या मते, वेस्ट इंडिज हा सध्या अत्यंत निरुपयोगी संघ आहे, त्यामुळेच भारत त्यांना पराभूत करत आहे.”
दुसर्या युजरने लिहिले, “सकाळ झाल्यावर माझी प्रतिक्रिया तशीच असते.” व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने लिहिले, “दिवसा झोपल्यानंतर उठलो, सकाळ झाली की रात्र हे कळत नाही.” त्यात आणखी एका यूजरने लिहिले की, “हिटमॅनला वडापाव नाही मिळाला म्हणून तो नाराज झाला आहे.”
सामन्यात काय झालं?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी २ बाद ७६ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे खंडित झाला. दुसऱ्या सत्राचा खेळ पावसामुळे जवळपास वाहून गेला. अशा स्थितीत पाचव्या दिवशीही खेळ अर्धा तास आधी सुरू होईल. वेस्ट इंडिजचे आठ विकेट्स घेण्यासाठी भारताला जवळपास ९८ षटके बाकी आहेत.
त्याचबरोबर वेस्ट इंडिजला विजयासाठी २८९ धावांची गरज आहे. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपला. टीम इंडियाला १८३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव २ बाद १८१ धावा करून घोषित केला आणि एकूण ३६४ धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले.