IND v AUS World Cup 2023 Final : भारतात चालू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादेत दाखल झाले असून खेळाडूंनी आज बराच वेळ सराव केला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी बराच वेळ खेळपट्टीच्या अवतीभोवती घालवला. अंतिम सामन्यात खेळपट्टी कशी असेल यासह या सामन्याच्या रणनीतिवर हे पाचही जण चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला अंतिम सामना खूप रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. दोन तुल्यबळ संघ जागतिक स्तरावरील इतक्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सलग १० सामने जिंकून अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रवास हा चढ-उतारांचा असला तरी पॅट कमिन्सचा संघ आता मजबूत दिसतोय. ऑस्ट्रेलियन संघानेदेखील सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ २००३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिडले होते. तेव्हा रिकी पॉन्टिंगच्या संघाने भारताचा तब्बल १२५ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाकडे त्याच पराभवाचा बदला घेण्याची यावेळी संधी आहे.
दरम्यान, शुक्रवारी रोहित शर्मासह संघाच्या प्रशिक्षकांनी खेळपट्टीची पाहणी केली. तसेच बराच वेळ सराव केला. रोहित शर्माने फलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचाही सराव केला. रोहितने स्लिपमध्ये चेंडू झेलण्याचा सराव केला. रोहितबराबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी रोहितकडून स्लिपमध्ये बराच वेळ सराव करून घेतला. रोहितचा स्लिपमध्ये चेंडू झेलण्याचा सराव बराच वेळ सुरू होता. याचे काही व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
यष्ट्यांजवळ (स्टंप्स) रोहितचा सराव पाहून अनेकांनी अंदाज बांधला आहे की, अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असावी. म्हणूनच रोहित स्लिपमधील क्षेत्ररक्षणाचा सराव करत होता. ही खेळपट्टी थोडी धिमी असेल, असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतीय संघाकडे कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाच्या रुपात दोन तगडे फिरकीपटू आहेत. हे दोन्ही गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कुलदीपने यंदाच्या स्पर्धेत १५ तर जाडेजाने १६ बळी घेतले आहेत. दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्सचा संघ फिरकीपटूंपुढे ढेपाळताना अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या चिंता वाढल्या आहेत.