IND v BAN Ashwin said Jasprit Bumrah is the Kohinoor diamond of Indian cricket : टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं आहे. यावेळी अश्विनने बुमराह हा भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा असल्याचे म्हटले आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेलिब्रेशनदरम्यान विराट कोहली मुंबईत म्हणाला होता की, बुमराहला जपून ठेवा, ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. यावर अश्विनने म्हटले आहे की लोक त्याला फिटेस्ट क्रिकेटर मानत नाहीत, पण तो सर्वात फिट क्रिकेटर आहे. कारण ताशी १४५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणे सोपे नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तो कडक उन्हात १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो’ –

अश्विनने बुमराहची तुलना एका ट्रकशी केली आहे. तो म्हणाला की, ट्रकमध्ये बिघाड होते. कारण तो जास्त भार वाहून नेतो. चेन्नई कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर ६ विकेट्स घेणारा आर अश्विन त्याच्या हिंदी यूट्यूब चॅनेल ‘ऐश की बात’वर म्हणाला, “जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे. तो इतक्या कडक उन्हात १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असतो. तो खूप मेहनती आहे. तो सध्या भारतीय क्रिकेटमधील मुकुटमणी आहे. जसप्रीत बुमराह सध्या भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा आहे. कपिल देव यांच्यानंतर असा कोणी वेगवान गोलंदाज झाला आहे का? एक माणूस आला आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह, जो तुम्हाला सामने जिंकून देत आहे.”

अश्विनने खास उदाहरण देऊन केले स्पष्ट –

अश्विन पुढे म्हणाला, “लोक म्हणतात की जर तो जखमी झाला तर तो कसला सर्वात फिटेस्ट क्रिकेटर आहे. भाई, मर्सिडीज आणि लॉरी (ट्रक) मध्ये फरक आहे. जर तुम्हला मर्सिडीज बेंझ चालवायची असेल तर ती चालवणे महाग आहे. कारण त्याचे स्पेयर पार्ट्स महाग आहेत. टिपर लॉरी कशी आहे, विचार करा. ती संपूर्ण भार घेऊन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाईल. तसेच वेगवान गोलंदाज पण एक लॉरी आहे, जिचा ब्रेकडाऊन होणारच. त्याने स्ट्रेस फ्रॅक्चरनंतर खूप मेहनत करून पुनरागमन केले आहे. तो सध्या १४५ किमी तास वेगाने गोलंदाजी करत आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो भाई, तो भारतीय क्रिकेटच्या कोहिनूर हिरा आहे.”

हेही वाचा – IND vs BAN : ‘ऋषभ पंतचे कसोटीतील पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील…’, ॲडम गिलख्रिस्टचे वक्तव्य

रविचंद्रन अश्विन ठरला सामनावीर –

चेन्नई कसोटी सामन्यात दमदार अष्टपैलू कामगिरीसाठी अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ११३ धावा केल्या होत्या. अश्विन अशा वेळी फलंदाजीला आला, जेव्हा संघाने १४४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. इथून त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी मोठी भागीदारी साकारली. अश्विनने फलंदाजीबरोबरच चेंडूनेही चांगली कामगिरी करत दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत बांगलादेशचा डाव २३४ धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind v ban r ashwin says jasprit bumrah is currently the kohinoor diamond of indian cricket in his youtube video vbm