Rishabh Pant missed out on 7th Test century in IND v NZ 1st test match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु सामन्यात चौथ्या दिवशी भारताने दमदार कमबॅक केले. या सामन्यात ऋषभ पंतने वादळी खेळी साकारली. मात्र, अवघ्या एका धावेने त्याचे कसोटी कारकीर्दीतील ऐतिहासिक सातवे शतक हुकले. त्याने अवघ्या १०५ चेंडूत ९ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकत ९९ धावांची दमदार खेळी साकारली. तो बाद झाल्यानंतर स्टेडियमसह ड्रेसिंग रूममध्ये पसरली भयाण शांतता पसरली होती.
ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले असते, तर त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले असते. ज्यामुळे तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा यष्टिरक्षक ठरला असता, पण तसे होऊ शकले नाही. सध्या, पंत आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी यष्टिरक्षक म्हणून त्यांच्या कसोटी कारकिर्दीत प्रत्येकी एकूण ६ शतके झळकावली आहेत आणि दोघेही संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. ऋद्धिमान साहाने कसोटीत ३ शतके झळकावली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारे यष्टिरक्षक:
- ऋषभ पंत- ६ शतके
- महेंद्रसिंग धोनी- ६ शतके
- ऋद्धिमान साहा- ३ शतके
- फारुख इंजिनियर – २ शतके
- सय्यद किरमाणी – २ शतके
हेही वाचा – Ranji Trophy : श्रेयस अय्यरने संपवला ३ वर्षांचा दुष्काळ, रणजी ट्रॉफीत शतक झळकावत गाठला मोठा टप्पा
ऋषभ पंतने यष्टीरक्षक म्हणून सोडली छाप –
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाने ऋद्धिमान साहाचा यष्टिरक्षक म्हणून संधी दिली होती, पण त्याला आपली छाप सोडता आली नाही. यानंतर ऋषभ पंतला टीम इंडियाचा यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली. त्याने २०१८ मध्ये त्याने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. यानंतर त्याने परदेशात दमदार कामगिरी केली आणि यष्टिरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले.
ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर तो टीम इंडियाचा सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी ३६ कसोटी सामन्यांमध्ये २५४२ धावा केल्या आहेत, ज्यात ६ शतकांचा समावेश आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८७१ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १२०९ धावा आहेत.