India vs Afghanistan 1st T20 Match: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जाणार आहे. मोहालीत थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. यातून भारतीय खेळाडूही सुटलेले नाहीत. त्यांना थंडीत खेळणे कठीण होत आहे. सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होताना दिसला. बीसीसीआयने गुरुवारी (११ जानेवारी) सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडूंनी आपले थंडीबाबतचे अनुभव सांगितले.
पहिला सामना ११ जानेवारीला मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-२० मालिका खेळण्याच्या तयारीत असलेला अफगाणिस्तान संघ गेल्या काही दिवसांपासून मोहालीत सराव करत आहे. येथील घसरलेले तापमान आणि दाट धुके पाहता या कठीण परिस्थितीत सामना कसा पूर्ण होईल याची क्रिकेट चाहत्यांसह त्यांनाही चिंता सतावत असेल. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना येथील कडाक्याच्या थंडीचा फारसा फटका बसणार नाही कारण, त्यांच्या देशातही थंडीची परिस्थिती सारखीच आहे, परंतु दाट धुक्यात फ्लड लाइट्सखाली खेळणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू अक्षर पटेल आणि आवेश खान यांनी मजेशीर किस्से सांगितले. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आवेश खानने या थंडीत कविता केली. दुसरीकडे, प्रशिक्षक राहुल द्रविडने बंगळुरूशी मोहालीच्या थंडीची तुलना केली आहे.
मोहालीच्या या स्टेडियममध्ये टी–२० क्रिकेटची आकडेवारी कशी आहे, जाणून घ्या
भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होईल. टी-२० विश्वचषक यंदा जूनमध्ये होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची मालिका असेल. पहिला सामना पीसीए स्टेडियम, मोहाली येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी या स्टेडियममध्ये ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत.
पंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा स्टेडियम मोहाली
मोहालीच्या या स्टेडियममध्ये आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत. भारताने ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ वेळा भारताने विजय मिळवला आहे तर, एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मैदानावर अफगाणिस्तानचा हा पहिला टी-२० सामना आहे. ६ पैकी ४ वेळा, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे आणि २ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या स्टेडियममध्ये अद्याप एकही सामना अनिर्णित राहिलेला नाही.
पीसीए स्टेडियमवर २०२२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला होता, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पीसीए स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक टी-२० धावा आहेत, त्याने ३ डावात १५६ धावा केल्या आहेत. या मैदानावर जेम्स फॉकनरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून, त्याने ६ टी-२० विकेट्स घेतल्या आहेत. या मैदानावर संघाची सर्वोच्च धावसंख्या २११ धावा आहे, जी भारताने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती. आतापर्यंत या मैदानावर ४ डावात २०० हून अधिक धावा झाल्या आहेत. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे, येथे सर्वात कमी धावसंख्या १४९ धावा आहे.