IND vs AFG 1st T20 India beat Afghanistan by 6 wickets : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने शिवम दुबेच्या अर्धशतकाच्या जोरावर १७.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारतासाठी शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावांची खेळी साकारली. याशिवाय जितेश शर्मानेही ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर मुजीबने अफगाणिस्तानकडून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली –
१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता धावबाद झाला. सलामीचा जोडीदार गिलसोबत योग्य ताळमेळ राखता न आल्याने रोहित शर्मा धावबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शुबमन गिलने तिलक वर्मासोबत २८ धावांची भागीदारी केली. पण गिललाही क्रीजवर जास्त वेळ घालवता आला नाही आणि चौथ्या षटकात तो मुजीब उर रहमानचा बळी ठरला.
हेही वाचा – Virat Kohli : फुटबॉलपटू रोनाल्डोने विराटला ओळखण्यास दिला नकार, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी ४४ धावांची (२९ चेंडू) भागीदारी केली, जी ९व्या षटकात तिलक बाद झाल्यानंतर संपुष्टात आली. तिलक वर्माने २२ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. त्याबरोबर अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने दोन आणि अजमतुल्ला उमरझाईने एक विकेट घेतली.
अफगाणिस्तानसाठी नबीची चमकदार कामगिरी –
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावून १५८ धावा केल्या. यादरम्यान नबीने २७ चेंडूंचा सामना करत ४२ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. अजमतुल्लाने २२ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. यादरम्यान अक्षर पटेलने भारताकडून अप्रतिम गोलंदाजी करत २ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात २३ धावा दिल्या. मुकेश कुमारने ४ षटकात ३३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शिवम दुबेलाही एक यश मिळाले. आता या मालिकेत दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाईल.