India beat Afghanistan by 6 wickets in Indore : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर सहा विकेट्सनी मात करत मालिकेत २-० ने अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७२ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने शिवम-यशस्वी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर १४.४ षटकांत ४ विकेट गमावत १७३ धावा करून सामना जिंकला.
यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांची तुफानी खेळी –
भारताकडून यशस्वी जैस्वालने ३४ चेंडूत सर्वाधिक ६८ धावा केल्या. या युवा सलामीवीराने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकार मारले. शिवम दुबेने ३२ चेंडूत नाबा ६३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. विराट कोहलीने १६ चेंडूत २९ धावांची आकर्षक खेळी खेळली. मात्र, याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा यांना भोपळाही फोडता आला नाही. रिंकू सिंग ९ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानसाठी करीम जानतने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय फजुल्ला फारुकी आणि नवीन उल हक यांना प्रत्येकी १ यश मिळाले.
तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांत १७२ धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी अष्टपैलू गुलबदिन नायबने ३५ चेंडूत सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. भारतासाठी अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगने ४ षटकात ३२ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. याशिवाय अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. शिवम दुबेने एक विकेट आपल्या नावावर केली.पण अक्षर पटेलने अवघ्या १७ धावां दिल्या शिवम दुबेने एक विकेट आपल्या नावावर केली. या सामन्यात अक्षर पटेल सामनावीर ठरला. मालिकेतील तिसरा सामना १७ जानेवारीला बंगळुत खेळला जाईल.
रोहित शर्माने रचला इतिहास –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात १५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला हे स्थान मिळवता आले नाही. अशा परिस्थितीत रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. रोहितच्या कारकिर्दीतील नवीन कामगिरी पाहून त्याचे चाहते आनंदी झाले. या विक्रमासाठी कर्णधारावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.