India vs Afghanistan 2nd T20 Match, Rohit Sharma: इंदोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून भारताने मालिका २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या काळात भारतीय कर्णधार रोहित शर्माने १५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही पूर्ण केले. सामना जिंकल्यानंतर रोहितने सर्वात लहान फॉरमॅटमधील आपल्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, “१५० टी-२० सामने होणे हा खूप मोठा प्रवास आहे आणि मी त्यातील प्रत्येक क्षण अनुभवला असून तो जपून ठेवला आहे.”
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून तब्बल १४ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र, शेवटच्या दोन्ही डावात कर्णधार शून्य धावसंख्येवर बाद झाल्याने त्याचे टी-२० मध्ये पुनरागमन काही विशेष झाले नाही. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने या दोन्ही सामन्यांमध्ये नेत्रदीपक विजयाची नोंद केली आहे.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “ही खूप छान भावना आहे, २००७ मध्ये सुरू झालेला हा एक प्रवास खूपच मोठा झाला आहे. इथे घालवलेला प्रत्येक क्षण मी जपला आहे. आम्हाला काय करायचे आहे याबद्दल संघातील सर्व खेळाडूंना कल्पना होती. प्रत्येकासाठी अतिशय स्पष्ट संदेश देण्यात आले होते. जेव्हा तुम्ही अशी कामगिरी पाहता तेव्हा तुम्हाला खरोखर अभिमान वाटू शकतो. त्याबद्दल बोलणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे, परंतु प्रत्यक्षात तिथे जाणे आणि असे खेळणे हे खूप अवघड काम आहे.” दरम्यान, रोहितने शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालचे कौतुक केले. युवा फलंदाजांनी सामन्यात मोक्याच्या क्षणी ९२ धावांची मोठी भागीदारी केली आणि आपापले अर्धशतक पूर्ण केले.
रोहित पुढे म्हणाला, “गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही बर्याच गोष्टी टिक केल्या आहेत. जैस्वाल आता कसोटी क्रिकेट आणि अगदी टी-२० क्रिकेटही खेळत असताना त्याच्यासाठी ही काही वर्षे चांगली गेली आहेत. तो किती उत्तम खेळाडू आहे हे त्याने दाखवून दिले. त्याच्याकडे प्रतिभा असून मोठे शॉट्स कधी आणि कुठे खेळायचे याचा अनुभव आता त्याला येत आहे. तो मैदानाच्या सर्व बाजूला मोठे शॉट्स खेळू शकतो. शिवम दुबे हा भारतीय संघाला मिळालेला नवा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या चौकार-षटकारांवरुन तो खूप ताकदवान खेळाडू आहे, हे दिसते. शिवम फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतो, यामुळे मधल्या फळीतील त्याची जागा ही पक्की होऊ शकते. त्याला दिलेली ही भूमिका तो चोखपणे बजावत आहे. दुबे संघात आला आणि त्याने संघासाठी दोन महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या.”
भारताने घरच्या भूमीवर सलग सहावी टी-२० मालिका जिंकली आहे. यासह मायदेशात सलग १५व्या मालिकेत अपराजित राहण्याचा भारताचा विक्रम अबाधित आहे. टीम इंडियाने शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९ मध्ये घरच्या मैदानावर गमावली होती. यानंतर खेळल्या गेलेल्या १५ मालिकांपैकी दोन बरोबरीत संपल्या तर १३ भारताच्या नावावर आहेत. अनिर्णित राहिलेल्या दोन्ही मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेल्या. भारताने टी-२० मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध यशस्वीरित्या गाठलेले हे दुसरे सर्वोच्च लक्ष्य आहे. श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने २०२२ मध्ये शारजाह येथे अफगाणिस्तानविरुद्ध १७६ धावांचे लक्ष्य गाठले होते. कालच्या सामन्यात टीम इंडियाने १७३ धावांचा पाठलाग करत दुसऱ्यांदा मोठा विजय मिळवला. भारताव्यतिरिक्त आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध १६९ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले होते.