IND vs AFG T20 Series: बीसीसीआयने रविवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली एक वर्षानंतर परतला आहे, दोघांनी आपला शेवटचा टी-२० सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत, काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. पण माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने या निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ट्वीटरवर ट्वीट करताना आकाश चोप्राने श्रेयस अय्यरच्या संघात नसण्यावर प्रश्न उपस्थित केला. चोप्राने लिहिले की, “श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. आता त्याला अफगाणिस्तानविरुद्ध संघात स्थान मिळाले नाही, हे न समजण्यापलीकडे आहे.”
“शिवम दुबेला या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे, मात्र तो नेहमी आत-बाहेर का जात असतो,” असे प्रश्न चोप्राने उपस्थित केले. त्याने पुढे लिहिले, “शिवम दुबे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिकेत संघात होता पण, मग नंतर त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली नाही. त्याचे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.”
इशान किशन कुठे आहे?
आकाश चोप्राने इशान किशनच्या संघात नसण्यावरही प्रश्न उपस्थित केला होता. वास्तविक त्याची दक्षिण आफ्रिकेतील टी-२० संघात निवड झाली होती पण जितेश शर्माला प्लेइंग-११ मध्ये स्थान देण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या कसोटी मालिकेतून इशान किशनने अचानक आपले नाव मागे घेतले. सततच्या प्रवासामुळे त्याला थकवा जाणवत होता आणि विश्रांती घ्यायची होती, असे या बातमीत कारण समोर आले आहे.
आकाश चोप्राने आपल्या ट्वीटमध्ये इशान किशनबद्दल लिहिले, “शिवम दुबेला स्थान मिळाले पण, इशान किशन कुठे आहे? त्याच्या उपलब्धतेबद्दल काहीही माहिती बीसीसीआयने दिली नाही. सेंच्युरियनच्या अवघड खेळपट्टीवर शतक झळकावणारा के.एल. राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज होता. पण, अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याला अफगाणिस्तान दौऱ्यासाठी टी-२० संघात स्थान दिले नाही. यासर्व प्रश्नांची उत्तरे निवड समितीने देणे आवश्यक आहे.”
भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी–२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. , आवेश खान, मुकेश कुमार.