India vs Afghanistan 1st T20 Match: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सहा विकेट्सने शानदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि खेळाडू एम.एस. धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला. खरं तर, सामना संपल्यानंतर शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी विजयाचे श्रेय हे धोनीला दिले. त्यांच्या शानदार खेळीच्या पाठीमागे धोनीचा मोठा हात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सामन्यातील सामनावीर ठरलेला शिवम दुबे जिओ सिनेमावरील सामन्याच्या प्रेझेंटेशन दरम्यान म्हणाला, “मी नेहमी माही धोनी भाईशी बोलत असतो. तो खरोखरच एक महान खेळाडू आहे. मी त्यांच्याकडून नेहमीच शिकत असतो. तो मला नेहमीच प्रोत्साहन देतो. ते मला चांगले खेळण्यासाठी प्रेरित करतात.” त्याचवेळी रिंकू सिंगनेही धोनीचे कौतुक करत म्हटले की, “मी माही भाईशी बोललो आहे, त्यांनी मला सांगितले की, चेंडूनुसार शॉटस खेळायला शिकायला हवेत. मोठे फटके मारताना नेहमी शांत राहिले पाहिजे आणि मीही तेच करतो. मी फलंदाजी करताना फारसा विचार करत नाही, मी फक्त चांगल्या चेंडूला सन्मान देतो आणि खराब चेंडूला चौकार किंवा षटकार मारतो.”
वास्तविक, सामना संपल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना शिवम दुबेशी गप्पा मारताना म्हणाला की, “जर माही भाईने आज रात्री तुझी गोलंदाजी पाहिली असेल, तर या आयपीएल सीझनमध्ये सीएसकेसाठी तुझे प्रत्येक सामन्यात ३ षटके निश्चित आहेत.” येथे शिवम दुबेनेही आपले मन मोकळे करून धोनीला आवाहन केले. तो म्हणाला, “माही भाई कृपया सुरेश रैना भाई सुचवत आहेत ते ऐका.”
एम.एस. धोनी त्याचा कसा वापर करतो हे पाहण्यासाठी या आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा शिवम दुबेवर असतील. जर त्याने आयपीएलच्या दोन महिन्यांत चांगली कामगिरी केली, तर टी-२० विश्वचषकात त्याची ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ निवड झाली तर आश्चर्य वाटायला नको. शिवम दुबेची खास गोष्ट म्हणजे तो चौथ्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकावर कुठेही फलंदाजी करू शकतो. याशिवाय कॅरेबियन आणि अमेरिकन भूमीवर सामने खेळवले जातील तेव्हा त्यांचा स्लोअर खूप प्रभावी ठरू शकतो.
शिवम दुबे आयपीएलमध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेकडून गेल्या काही सीझनमध्ये खेळत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. शिवम दुबेच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळताना त्याने एम.एस. धोनीकडून सामना कसा संपवायचा याबद्दल बरेच काही शिकला आहे.
हा सामना जिंकणाऱ्या टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील दुसरा सामना इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील, जो वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-२० सामना खेळू शकला नाही आणि त्यामुळे कोहली वर्ल्ड कप २०२२ नंतर थेट या छोट्या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.