India vs Afghanistan 1st T20 Match: टीम इंडियाने पहिला सामना सहा गडी राखून जिंकून भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. शिवम दुबे भारताच्या विजयाचा हिरो ठरला, ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली. सामन्यांनंतर शिवम दुबेने रोहित शर्माबरोबर काय चर्चा झाली यावर देखील भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवमला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. या मालिकेत संधी मिळताच शिवमने दाखवून दिले की, टी-२० फॉरमॅटमध्ये तो किती महत्त्वाचा खेळाडू आहे. सामनावीर पुरस्कार शिवमसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्चित होऊ शकते.

सामन्यानंतर बीसीसीआय टीव्हीवर शिवम दुबेला काही प्रश्न विचारण्यात आले, जेव्हा त्याला या सामन्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला वाटते की ही आजची खेळी माझ्यासाठी खूप खास आहे कारण, मी खूप दिवसांनी भारतीय संघात परतलो आहे. मला एक संधी मिळाली आणि ती बाब खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण लक्ष्याचा पाठलाग करतो तेव्हा एका फलंदाजाच्या मनात नेहमी एकच विचार असतो तो म्हणजे, सामना जिंकवून तंबूत परतणे. मी सामना संपवला, संघाला विजय मिळवून दिला त्यामुळे खूप छान वाटले.”

थंडीत फलंदाजी करण्याबाबत शिवम म्हणाला, “खूप मजा आली, सुरुवातीला फलंदाजी करायला गेल्यावर मला बॅट नीट धरता येत नव्हती, पण एक-दोन चेंडू खेळल्यानंतर सगळं सुरळीत होतं गेलं. मोहालीमध्ये थंडी किती आहे काय आहे, याचा विचार माझ्या डोक्यात आला नाही. एकदा तुम्ही मैदानात पोहचलात की मॅचमध्ये जी भावना आणि वातावरण असत त्यात सगळं विसरायला होतं.” विजयानंतर चाहते काय म्हणाले, यावर शिवमने मजेशीर उत्तर दिले, “आम्ही सर्वजण खूप आनंदी होते, त्यांनी माझे अभिनंदन केले, सर्वांनी सांगितले की मी खूप चांगला खेळलो. कर्णधार, प्रशिक्षक आणि सर्व खेळाडू खूप खुश होते.”

हेही वाचा: NZ vs PAK: शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानी गोलंदाजांचा वेग कमी झाल्याने व्यक्त केले आश्चर्य; म्हणाला, “स्पीड मीटर…”

रोहित शर्माबरोबरच्या संभाषणात शिवमने खुलासा केला, तो म्हणाला, “त्यांनी (रोहित) मला एकच गोष्ट सांगितली की असे खेळत राहा. तुमच्या खेळात सकारात्मक राहा, आम्हाला माहित आहे की तुम्ही कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करून धावा करू शकता आणि तुम्ही आम्हाला कोणत्याही स्थानावर खेळून सामने जिंकूंन देऊ शकतात. त्यामुळे अशीच कामगिरी करत राहा.” पुढे गोलंदाजीतील कामगिरीविषयी तो म्हणाला की, “टी-२० मध्ये गोलंदाजी करायला आलो आणि दुसऱ्याच चेंडूवर मला विकेट मिळाली, त्यामुळे स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो.”

मोहाली टी-२० मध्ये प्रथम खेळताना अफगाणिस्तानने २० षटकात ५ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या १७.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, १४ महिन्यांनंतर टी-२० संघात पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. शुबमन गिलने १२ चेंडूत २३ धावा, तिलक वर्माने २२ चेंडूत २६ धावा आणि जितेश शर्माने २० चेंडूत ३१ धावा केल्या. अखेरीस शिवम दुबे ६० धावांवर नाबाद तर रिंकू सिंग १६ धावांवर नाबाद माघारी परतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs afg i can score runs anytime by hitting long sixes shivam dubey claims for t20 world cup avw