India vs Afghanistan 3rd T20 Match: आज, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या २-०ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-२० मालिका आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा हा सामना जिंकून आपली तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
भारताने नाणेफेक जिंकली
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने प्लेइंग-११ मध्ये तीन बदल केले आहेत. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव संघात परतले आहेत. त्याचवेळी जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग खेळत नाहीत. अफगाणिस्तानच्या प्लेइंग-११ मध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नवीन-उल-हक, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी यांना प्लेइंग-११ मधून वगळण्यात आले आहे.
रोहित क्लीन स्वीप करून फॉर्ममध्ये परतण्याची वाट पाहत आहे
मालिका जिंकणारा भारतीय संघ बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ‘क्लीन स्वीप’ करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. विजयी आघाडी कायम ठेवत कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फॉर्म सुधारण्यावर देखील लक्ष देणार आहे. कर्णधार रोहितची बॅट या मालिकेत अजूनही शांत आहे. पहिल्या सामन्यात तो शुबमन गिलबरोबर झालेल्या गैरसमजामुळे धावबाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्याला फजलहक फारुकीचा चेंडू कळला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो खाते न उघडताच बाद झाला. रोहितच्या खराब फॉर्मची संघ व्यवस्थापनाला जरी काळजी नसली तरी शेवटच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच असेल.
विराटने छोटी पण शानदार खेळी खेळली
टी-२० मध्ये भारतीय संघ सुरुवातीला सावध खेळ करत असून शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याचे धोरण अवलंबत आहे. पण आता फलंदाज पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ करत आहेत आणि हे शिवम दुबे आणि विराट कोहलीने दाखवून दिले आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कोहलीने इंदोरमध्ये १६ चेंडूत २९ धावा केल्या. त्याने अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीबूर रहमानचा सामना केला आणि ७ चेंडूत १८ धावा केल्या. साधारणपणे कोहली फिरकीपटूंविरुद्ध सावकाश खेळतो, पण दुसऱ्या टी-२० सामन्यात हे दिसले नाही.
हेही वाचा: SL vs ZIM: झिम्बाब्वेचा ११ चेंडूत ३४ धावा करून विजय, मॅथ्यूज ठरला पराभवाचे कारण; जाणून घ्या
शिवम दुबेने दोन मॅच विनिंग इनिंग खेळल्या
गेल्या वर्षी डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दुबे तीन वर्षांनी भारतीय संघात परतला होता. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला, मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघात त्याला स्थान मिळाले नाही. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानशिवाय खेळत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध त्याने दोन आक्रमक अर्धशतके झळकावली. सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही अर्धशतक झळकावले. भारताची नजर पुन्हा या दोन तरुणांवर असेल.
दोन्ही संघांचे प्लेइंग–११
भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झादरान, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.