ICC Cricket World Cup, India vs Afghanistan: विश्वचषक २०२३ च्या दहाव्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने वर्ल्डकपमधील बॅक टू बॅक सामने जिंकले आहेत. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी केली. रोहितने केवळ ८४ चेंडूत १३१ धावांची खेळी केली आहे. याशिवाय विराट कोहलीनेही शानदार खेळी केली आहे. भारताने हा सामना ८ विकेट्सने जिंकला . तर अफगाणिस्तानला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले.
इशान आणि रोहित जोडीने केली कमाल –
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अफगाणिस्तानने योग्य निर्णय घेतल्याचे दिसत होते, कारण भारतासारख्या भक्कम गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानने ५० षटकांचा खेळ संपल्यानंतर २७२ धावा केल्या आणि भारतासमोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवले.भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या चेंडूने कहर केला. बुमराहने १० षटकात केवळ ३९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर भारताकडून सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्याच षटकापासून अफगाण गोलंदाजांकडून षटकार मारण्यास सुरुवात केली. इशान किशननेही या सामन्यात चमकदार कामगिरी करत ४७ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.
कोहलीने बॅक टू बॅक झळकावली अर्धशतकं –
रोहित आणि इशान बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. कोहलीने मागील सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. यानंतर आज पुन्हा एकदा त्याने अर्धशतक झळकावले. आजच्या सामन्यात कोहलीने ५६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली आहे. या खेळीत कोहलीने ६ चौकारही मारले. याशिवाय श्रेयस अय्यरनेही शेवटच्या क्षणी कोहलीला चांगली साथ दिली आणि २३ चेंडूत २५ धावांची खेळी खेळली. अशा प्रकारे भारताने हा सामना सहज जिंकला आहे. जेव्हापासून भारतीय फलंदाज मैदानात उतरले तेव्हापासून भारताचा सामना अफगाणिस्तानच्या बाजूने झुकल्याचे एकदाही वाटले नाही. अशा प्रकारे भारताने एकतर्फी लढत जिंकली आहे.
हेही वाचा – World Cup 2023, IND vs AFG: रोहित शर्मा ठरला जगातील नवा सिक्सर किंग, मोडला ख्रिस गेलचा मोठा विश्वविक्रम
तत्पूर्वी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून २७२ धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध अफगाणिस्तानची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तसेच अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावा केल्या. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या इतर अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. २२ धावा करणारा इब्राहिम झद्रान संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.