IND vs AFG, World Cup 2023, Rohit Sharma: एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध स्रुरू आहे. टीम इंडियाला विजयाची मालिका कायम राखून हा सामना जिंकायचा आहे आणि गुणतालिकेत आपले स्थान आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान भारताचा हिटमॅन अशी ओळख असणारा रोहित शर्माने अफगाणी गोलंदाजांना अक्षरशः धू-धू धुतले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. आज दिल्लीतील राजधानी एक्स्प्रेसपेक्षा रोहित एक्स्प्रेस जास्त जोरात धावली. त्याने अरुण जेटली स्टेडियममध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतक (७) करणारा ‘रोहित शर्मा’ हा दुसरा फलंदाज ठरला. त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ६ शतकांचा विक्रम मोडला. तसेच, त्याच्या वादळी खेळीने ४० वर्षापूर्वीच्या कपिल देवचा कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रमही मागे टाकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी (११ ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषकात इतिहास रचला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले. रोहित वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर सात शतके आहेत. सचिनने सहा शतके झळकावली होती.

रोहित शर्माला २०१५ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली. त्या आवृत्तीत त्याने शतक झळकावले. चार वर्षांनंतर, २०१९ मध्ये जेव्हा तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आला तेव्हा त्याने पाच शतके झळकावली. आता अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने तेंडुलकरचा १२ वर्षे जुना विक्रम मोडला. सचिनने १९९२ ते २०११ या सहा विश्वचषक स्पर्धेत ४५ सामन्यांत सहा शतके झळकावली होती. विश्वचषकातील १९व्या सामन्यात रोहितने त्याला मागे टाकले.

रोहितने कपिल देवचा विक्रम मोडला

रोहितने ६३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. या बाबतीत रोहितने महान कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी १९८३च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या ७२ चेंडूत शतक झळकावले होते. कपिल देव यांच्यानंतर वीरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. त्याने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ८१ चेंडूत शतक झळकावले होते.

हेही वाचा: IND vs AFG: दिल्लीत कोहली… कोहली…चा आवाज दुमदुमला; नवीन उल हक फलंदाजीला येताच विराटच्या चाहत्यांनी स्टेडियम गाजवलं

रोहितने ख्रिस गेलचा विक्रम मोडला

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने एक मोठा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी हिटमॅनला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी तीन षटकारांची गरज होती. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकार मारले होते. त्याने ४८३ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ५५१ डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याचवेळी रोहितने केवळ ४५३ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ४७३व्या डावात हा विक्रम केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs afg rohit scored a century in 63 balls broke kapil devs record indias score crossed 140 runs avw