बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (१७ जानेवारी) भारत विरुद्ध अफगाणिस्तान असा टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर २१२ धावांचा डोंगर उभा केला आहे. या सामन्यात रोहितने नाबाद १२१ धावांची दिमाखदार खेळी साकारली. ट्वेन्टी-२० प्रकारातलं रोहितचं हे पाचवं शतक आहे. या शतकासह टी-२० क्रिकेटमध्ये पाच शतकं ठोकणारा रोहित जगातला पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने आजच्या सामन्यात अवघ्या ६९ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि आठ षटकारांसह ही शतकी खेळी साकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजचा दिवस रोहित शर्माचा असला तरी या मालिकेतल्या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात रोहित भोपळादेखील फोडू शकला नव्हता. पहिल्या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलच्या चुकीमुळे रोहित धावबाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज फजलहक फारुकी याने रोहितला त्रिफळाचित केलं होतं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तरी रोहित धावांचं खातं उघडणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.

दरम्यान, आजच्या सामन्यातदेखील रोहितला पहिली धाव घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. रोहितने आजच्या सामन्यात डावाच्या सहाव्या चेंडूवर पहिली धाव घेतली. खरंतर रोहितला पहिल्या षटकात आणि त्याच्या डावातील पहिल्याच चेंडूवर खातं उघडण्याची संधी मिळाली होती. परंतु, पंचांच्या एका चुकीमुळे ती धाव रोहितच्या खात्यावर जमा झाली नाही. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहित स्ट्राईकवर आला. डावखुरा जलदगती गोलंदाज फरीद अहमदचा हा चेंडू रोहितने लेग साईडला फ्लिक केला, हा चेंडू फाईन लेगला सीमारेषेपार केला. परंतु, पंच वीरेंद्र शर्मा यांनी लेग बाय दिलं. त्यामुळे या चार धावा भारताच्या खात्यात जमा झाल्या. रोहितचं खातं मात्र उघडलं नाही. पुढच्या दोन चेंडूवर रोहितला एकही धाव घेता आली नाही. पाचव्या चेंडूवर रोहितने एक फटका लगावला, परंतु, चेंडू त्याच्या थायपॅडला लागून सीमारेषेपार गेला. षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहित रोहित एकही धाव घेऊ शकला नाही. परिणामी पाच चेंडू खेळूनही रोहितचं खातं उघडलं नव्हतं.

पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने एक धाव घेतली. रोहित पुन्हा स्ट्राईकवर आला. त्याचवेळी रोहितने पंच वीरेंद्र शर्मांबाबत त्याची नाराजी बोलून दाखवली. रोहित पंचांना जे काही बोलत होता ते यष्ट्यांमध्ये (स्टम्प) लावलेल्या माईकद्वारे सर्वांना ऐकू येतं होतं. रोहित म्हणाला, वीरू, थायपॅड पर दिया था क्या पहला बॉल? इतना बडा बॅट लगा था भाई, एक तो पहले ही दो झिरो पर हूं बे. (वीरेंद्र, पहिला चेंडू थायपॅडवर लागलाय असं म्हणत लेगबाय दिलास का? तो चेंडू बॅटवर लागला होता. आधीच मी दोन वेळा शून्यावर बाद झालो आहे.)

रोहित-रिंकूने भारताची घसरलेली गाडी रुळावर आणली

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु, भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात फरीद अहमदने उत्तम फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालला ४ धावांवर बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला विराट कोहली पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. पुढच्याच षटकात शिवम दुबेही तंबूत परतला. त्याला केवळ एका धाव करता आली. तर, संजू सॅमसनला फरीदनेच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यालाही खातं उघडता आलं नाही. त्यामुळे भारताची अस्था चार बाद २२ अशी झाली होती. या स्थितीतून संघाला बाहेर काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला रिंकू सिंहची साथ मिळाली. रोहित-रिंकू जोडीने सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर देत डावाची पडझड थांबवली. काही वेळाने खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहितने भात्यातल्या फटक्यांची पोतडी उघडत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. अझमतुल्ला ओमरझाइच्या चौथ्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर चौकार खेचत रोहितने या प्रकारातल्या पाचव्या शतकाला गवसणी घातली.

रोहित-रिंकू जोडीने पाचव्या विकेटसाठी ९५ चेंडूत १९० धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारली. रिंकूने कर्णधाराला तोलामोलाची साथ देत ३९ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी साकारली. त्याने २ चौकार आणि ६ षटकार लगावले. तर रोहित शर्माने ६९ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२१ धावा फटकावल्या. या दोघांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांमध्ये चार बाद २१२ धावांपर्यंत मजल मारली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs afg rohit sharma angry at umpire virender sharma after leg by runs asc