Rashid Khan Ruled Out Of T20I Series Against India : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (११ जानेवारी) होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच टी-२० प्रकारातील द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टी-२० सामने खेळले गेले आहेत. आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची दोन्ही संघांना चांगली संधी आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची मालिका आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.
यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार आहेत.मोहालीत होणाऱ्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. स्टार फिरकीपटू राशिद खान मालिकेतून बाहेर झाला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तो अद्याप सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार नाही. कर्णधार इब्राहिम झद्रानने राशिदच्या वगळण्याला दुजोरा दिला. सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत त्याने सांगितले की, आमच्या संघाला राशिदची उणीव भासेल.
राशिदशिवाय आम्ही संघर्ष करू: झाद्रान
इब्राहिम झाद्रान मोहालीत म्हणाला, “राशिद पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आम्हाला मालिकेत त्याची उणीव भासेल. आम्ही राशिदशिवाय संघर्ष करू, परंतु कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे.” राशिद अफगाणिस्तानकडून अखेरचा विश्वचषकात १० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. राशिदने पाच कसोटी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. त्याने १०३ एकदिवसीय सामन्यात १८३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ८१ टी-२० सामन्यात १३० विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – शिखर धवनने सांगितले लोकांचे लग्न न करण्यामागचे मजेदार कारण, VIDEO होतोय व्हायरल
टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान: इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शरफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद , नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.