India vs Afghanistan 3rd T20 Match: भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानवर निर्भेळ यश संपादन करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. जर टीम इंडिया हे करण्यात यशस्वी ठरला तर ते एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करतील.
आतापर्यंत, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आतापर्यंत आठ टी-२० द्विपक्षीय मालिकेत विरोधी संघाविरुद्ध निर्भेळ यश संपादन केले आहे. दोन्ही संघांनी आठ टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा सामना जिंकून भारत नवव्या मालिकेत क्लीन स्वीप करेल आणि ही कामगिरी करणारा पहिला संघ बनेल. भारत आणि पाकिस्ताननंतर इंग्लंडचा संघ चार क्लीन स्वीपसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने असे तीनदा केले आहे.
जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारताचा हा शेवटचा टी-२० सामना असेल आणि मोहाली आणि इंदोरसारख्या या सामन्यात भारताला एकतर्फी विजय मिळावा, असे संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. भारताने या मालिकेतील दोन्ही सामने सहा गडी राखून जिंकले. पहिला सामना १७.३ षटकांत १५९ धावांचा पाठलाग करून आणि दुसरा सामना १५.४ षटकांत १७३ धावांचा पाठलाग करून जिंकला.
टीम इंडिया या मालिकेत अतिशय आक्रमक वृत्तीने खेळली आहे. शिवम दुबे आणि विराट कोहलीच्या फलंदाजीत हे स्पष्टपणे दिसून येते. कोहली इंदोरमध्ये १४ महिन्यांनंतर भारतासाठी टी-२० सामना खेळत होता, परंतु त्याने १८१च्या स्ट्राइक रेटने १६ चेंडूत २९ धावा केल्या. त्याच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीची खास गोष्ट म्हणजे त्याने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब-उर-रहमान विरुद्ध ज्या पद्धतीने फटके मारले ते खूप खास होते. कोहलीने मुजीबच्या ७ चेंडूंवर १८ धावा केल्या आणि त्याच्याविरुद्ध २५७च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. कोहली नेहमी फिरकीविरुद्ध संथ खेळला आहे, पण यावेळी त्याने आक्रमक पद्धत स्वीकारली.
पहिल्या दोन सामन्यांत खातेही न उघडता माघारी परतणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा कामगिरी उंचावण्यासाठी उत्सुक असून आज, बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात त्याचा आक्रमक खेळीचा प्रयत्न असेल. जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार असून फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.
‘या‘ मालिकांमध्ये भारताने क्लीन स्वीप केला
वर्ष | मालिका | सामन्यांची संख्या |
२०१९-२०२० | न्यूझीलंड विरुद्ध भारत | ५-० ने विजय |
२०१५-२०१६ | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत | ३-० ने विजय |
२०१७-२०१८ | भारत विरुद्ध श्रीलंका | ३-० ने विजय |
२०१८-२०१९ | भारत विरुद्ध वेस्ट इंडीज | ३-० ने विजय |
२०१९-२०२० | वेस्ट इंडिज विरुद्ध भारत | ३-० ने विजय |
२०२१-२०२२ | भारत विरुद्ध न्यूझीलंड | ३-० ने विजय |
२०२१-२०२२ | भारत विरुद्ध वेस्ट इंडीज | ३-० ने विजय |
२०२१-२०२२ | भारत विरुद्ध श्रीलंका | ३-० ने विजय |