मुंबईच्या वानखेडे मैदानातील पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला २५५ धावांत रोखलं. विजयासाठी २५६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही चांगली झाली. सलामीवीर वॉर्नर आणि फिंच यांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने वन-डे क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता वॉर्नर चौथ्या स्थानी पोहचला आहे. त्याने ११५ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. भारतीय संघाचा कर्णधार विराटने ११४ डावांमध्ये याआधी ही कामगिरी केली होती.
Fastest to 5000 Odi Runs (Inngs)
Amla – 101
Richards – 114
Kohli – 114
Warner – 115*
Root – 116#INDvsAUS— CricBeat (@Cric_beat) January 14, 2020
दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना, भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. लोकेश राहुल अर्धशतकापासून अवघ्या ३ धावा दूर असताना बाद झाला आणि भारताची जोडी फुटली. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली.
अवश्य वाचा – Video : आला अंगावर, घेतलं शिंगावर ! पॅट कमिन्सला शिखरचा दणका
शिखर धवन ७४ धावांची खेळी करुन माघारी परतल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिल्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारत धावसंख्या वाढवू शकला नाही. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २५५ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्सने २ तर झॅम्पा-आगर आणि रिचर्डसन या त्रिकुटाने १-१ बळी घेतला.
अवश्य वाचा – Ind vs Aus : चौथ्या क्रमांकाची जागा ठरतेय विराटसाठी डोकेदुखी