India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकही यावर्षी भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे, त्या दृष्टिकोनातून एकदिवसीय स्वरूपातील प्रत्येक मालिका सर्व संघांसाठी महत्त्वाची आहे. आजचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला दुपारी १:३० पासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला मालिकेतील या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली असून तो दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करेल. यादरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाची कमान हार्दिक पांड्याकडे असेल. तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे असेल, ज्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही जबाबदारी ५ वर्षांनंतर मिळत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना या मैदानाची आणि खेळपट्टीची चांगली माहिती आहे. त्यांना येथे खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. आयपीएलदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही येथे भरपूर अनुभव मिळाला आहे. खेळपट्टीबद्दल बोलायचे तर, ही नेहमीच सपाट विकेट असते, जिथे फलंदाजांना भरपूर फायदा मिळू शकतो. संध्याकाळी दव पडल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे.
२०२० मध्ये येथे शेवटचा वनडे खेळला गेला होता. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन संघाने दणदणीत १० गडी राखून विजय मिळवत सर्वांनाच चकित केले. ऑस्ट्रेलियन संघासाठी त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी त्या सामन्यात शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने नाबाद १२८ आणि माजी कर्णधार अॅरॉन फिंचने नाबाद ११० धावा करत आपल्या संघाला ३७.४षटकांत विजय मिळवून दिला. फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे, पण डेव्हिड वॉर्नर सध्याच्या संघाचा भाग असल्याने त्याचा सामना करणे भारतीय गोलंदाजांना सोपे जाणार नाही.
आज मुंबईचे हवामान कसे असेल?
प्रत्येकाच्या मनात पावसाची भीती आहे. शुक्रवारी येथे आकाश ढगाळ असेल, परंतु पावसाची शक्यता नगण्य आहे आणि चाहत्यांना एकदिवसीय सामन्याचा संपूर्ण आनंद लुटण्याची संधी नक्कीच मिळू शकते ही आनंदाची बाब आहे. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर, आज कमाल तापमान ३१ अंश सेंटीग्रेड पर्यंत राहणे अपेक्षित आहे जे आर्द्रतेसह खेळाडूंना, विशेषत: पाहुण्या संघातील खेळाडूंना त्रास देऊ शकतो. हा दिवस-रात्र सामना असून दुपारी १:३० वाजता सुरू होणार आहे. त्याच वेळी, किमान तापमान २६ अंश सेंटीग्रेडपर्यंत राहू शकते, म्हणजे संध्याकाळी देखील खेळाडूंना आर्द्रतेपासून फारसा दिलासा मिळणार नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा