India vs Australia 1st T20 Updates, 23 November 2023 : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोश इंग्लिसच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या ८० आणि इशान किशन ५८ धावांच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, एक चेंडू शिल्लक असताना रिंकू सिंगने भारताला विजय मिळवून दिला. रिंकू १४ चेंडूत २२ धावा करून नाबाद परतला.

भारताने १९ षटकात ५ विकेट गमावत २०२ धावा केल्या होत्या. टीम इंडियाला विजयासाठी सहा चेंडूत सात धावा करायच्या होत्या. रिंकू सिंग आणि अक्षर पटेल क्रीजवर होते. सीन अॅबॉटच्या पहिल्याच चेंडूवर रिंकूने चौकार ठोकला. यानंतर पाच चेंडूत तीन धावा हव्या होत्या. पुढच्याच चेंडूवर रिंकूने एक धाव घेतली. यानंतर अक्षर पटेल तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेला रवी बिश्नोई चौथ्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. भारताला दोन चेंडूंवर दोन धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगने लेग साईडवर शॉट खेळून धाव घेतली. एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावण्याच्या प्रयत्नात अर्शदीप सिंग धावबाद झाला.

पण ‘त्या’ धावा रिंकूला मिळाल्याच नाहीत –

शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक होती. रिंकू स्ट्राइकवर होता. तो बाद झाला असता किंवा धावा करू शकला नसता, तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता, पण तसे झाले नाही. सीन अॅबॉटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला. दुर्दैवाने त्या सहा धावा रिंकूच्या खात्यात जमा झाले नाहीत. कारण अॅबॉटचा पाय रेषेच्या बाहेर गेला होता आणि पंचांनी तो नो-बॉल घोषित केला. अशा परिस्थितीत भारताच्या खात्यात षटकार ऐवजी एक धाव जमा झाली आणि टीम इंडियाने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. रिंकू सिंगने १४ चेंडूत २२ धावा केल्यानंतर नाबाद परतला.

सूर्या आणि इशानने सावरला टीम इंडियाचा डाव –

२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर १५ चेंडूतच पॅव्हेलियनमध्ये परतले. ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात खाते न उघडता धावबाद झाला. त्याला एका चेंडूचाही सामना करता आला नाही. तिसर्‍याच षटकात यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वीने आठ चेंडूत २१ धावा केल्या. दोन गडी बाद झाल्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – IND vs AUS T20 Series: मार्नस लाबुशेनने भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेवर उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘हे खूपच…’

सूर्यकुमारने ४२ चेंडूत ८० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. इशान किशनने ३९ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. तिलक वर्माने १२ आणि अक्षर पटेलने २ धावा केल्या. रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांना खातेही उघडता आले नाही. मुकेश कुमार शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने दोन विकेट घेतल्या. जेसन बेहरेनडॉर्फ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader