नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी दारुन पराभव केला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी तिन्ही शानदार विभाागात कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. यानंतर दिग्गज अॅलन बॉर्डरने पराभवानंतर स्टीव्ह स्मिथचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मात्र, स्मिथच्या फलंदाजीसोबतच त्याच्या थम्सअप प्रतिक्रियेचीही बरीच चर्चा होत आहे. वास्तविक, जडेजाने शनिवारी स्मिथविरुद्ध ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडूला टर्न केले. अशा चेंडूंचा स्मिथने बचाव केला. त्याचवेळी स्मिथने एका चेंडूचे कौतुक करताना थम्स अप केले. स्मिथच्या थम्सअपबद्दल सोशल मीडियावर जोरदार मीम्स शेअर केल्या जात आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अॅलन बॉर्डरने स्मिथचा खरपूस समाचार घेतला आहे.
फॉक्स क्रिकेटच्या वृत्तानुसार, बॉर्डर म्हणाला, “जेव्हा ते आम्हाला ऑफ-स्टंपच्या बाहेरच्या लाईनवर बीट करत होते, तेव्हा आपण त्यांना थम्प्सअप देत होतो.” अखेर हा काय तमाशा चालला आहे? हे खूपच हास्यास्पद आहे. आपण एखाद्याला थम्प्सअप देत आहोत… .” विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तरात भारताने ४०० धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या ९१ धावांत गारद झाला.
हेही वाचा – IND vs AUS: आर आश्विनच्या ‘पंचक’ने केली कमाल; अनिल कुंबळेसह ‘या’ गोलंदाजांचे मोडले विक्रम
भारताने तीन दिवसांतच पहिला कसोटी सामना जिंकला. कांगारू खेळाडूंकडे भारतीय फिरकी आक्रमणाला उत्तर नव्हते. या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी एकूण १६ विकेट घेतल्या. स्टीव्ह स्मिथ हा एकमेव खेळाडू होता जो दोन्ही डावात भारतीय आव्हानाला सामोरे गेला. स्मिथने पहिल्या डावात ३७ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो २५ धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा – IND vs AUS 1st Test: वसीम जाफरने उडवली ऑस्ट्रेलिया संघाची खिल्ली, ट्विट करत नव्या पद्धतीने शिकवली ABCD
जडेजा मॅन ऑफ द मॅच ठरला –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर फलंदाजीतही जडेजाची बॅट तळपली. जडेजाने भारतासाठी ७० धावांचे योगदान दिले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.