IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना आज नागपुरात खेळला जात आहे. नागपुरातील व्हीसीए क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची प्रथमच कसोटी संघात निवड झाली असून आता त्याला श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत पदार्पणाची संधीही मिळाली आहे. याशिवाय केएस भरतकडे कसोटी कॅपही देण्यात आली आहे.
टीम इंडियाला ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्याचसोबत भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावता येणार आहे. भारतीय संघाकडून आज ‘द- स्काय’अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव व अपघातात जखमी झालेला ऋषभ पंतच्या जागी संघात यष्टीरक्षक केएस भरत यांनी पदार्पण केले आहे. यावेळी बीसीसीआयने नवा पायंडा घातला अन् त्यांच्या त्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली.
‘मिस्टर ३६०’ अशी बिरुदावली लावून फिरणारा सूर्या आणि यष्टीरक्षक भरत यांना पदार्पणाची कॅप देत असताना बीसीसीआयने त्यांच्या कुटुंबियांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली. आपल्या कुटुंबियांसमोर हा अविस्मरणीत क्षण अनुभवताना दोन्ही खेळाडू भावूक झाले होते. आजी-माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांनीही दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबियांची भेट घेतली अन् हस्तांदोलन करून त्यांचेही अभिनंदन केले.
पहिल्या सामन्यात नाणेफेक पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकली. पण त्यांच्या संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. मात्र त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला असून सध्या ३२ षटकात ७५-२ अशी पहिल्या सत्रातील स्थिती आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियन संघ भारतीय खेळपट्टीविषयी तक्रार करत होता. याठिकाणच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजीसाठी अधिक अनुकूल असल्याचे ऑस्ट्रेलियाकडून बोलले जात होते. पण मोहम्मद सिराज आणि मोसम्मद शमी या भारतीय वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर अगदी सहजरित्या गोलंदाजी करत पहिल्या दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा प्रत्येकी एक-एक धाव करून तंबूत परतले.