भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर टॉड मर्फी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत ५ बळी घेतले. त्याचबरोबर त्याने एक विक्रम केला.
टॉड मर्फीला केवळ ७ प्रथम श्रेणी सामने खेळल्यानंतर कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १३ डावांमध्ये २५.२० च्या सरासरीने आणि २.६२ च्या इकॉनॉमी रेटने २९ विकेट्स घेतल्या. टॉड मर्फी हा पदार्पणाच्या सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज ठरला.
टॉड मर्फीने कसोटी पदार्पणातच इतिहास रचला –
मर्फीने पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेत इतिहास रचला आहे. पदार्पणातच ५ बळी घेणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर ठरला आहे. तो पीटर टेलर, जेसन क्रेझा आणि नॅथन लायनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला.
१९८६-८७ मध्ये सिडनी, इंग्लंडविरुद्ध – पीटर टेलर (६/७८)
२००८-०९ मध्ये नागपूर, भारताविरुद्ध -जेसन क्रेझा (८/२१५)
२०११ मध्ये गाले, श्रीलंकेविरुद्ध – नॅथन लायन – (५/३४)
२०२३ मध्ये नागपूर, भारताविरुद्ध – टॉड मर्फी – (५/८२)
मर्फीने या पाच फलंदाजांना केले बाद –
मर्फीच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी ठरला तो सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल, जो ७१ चेंडूत २० धावा करून बाद झाला. यानंतर फिरकीपटूने अश्विनला आपल्या जाळ्यात अडकवले. अश्विन एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ६२ चेंडूत २३ धावा जोडल्या. त्यानंतर मर्फीने चेतेश्वर (७) आणि विराट कोहली (१२) बाद केले. पदार्पणाच्या कसोटीत टॉप फोर विकेट घेणारा तो पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्यानंतर श्रीकर भरत (८) याने पाचव्या विकेटच्या रुपाने बाद केले.
पहिल्या कसोटीची स्थिती –
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात तिसरा दिवस अखेर ११४ षटकानंतर ७ बाद ३२१धावा केल्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने शर्माने २१२ चेंडूचा सामना करताना, १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावांचे योगदान दिले. तसेच रवींद्र जडेजा (६६) आणि अक्षर पटेल (५२) धावांवर नाबाद आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाला १४४ धावांची आघाडी मिळाली आहे.