भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने सात गडी गमावून ३२१ धावा केल्या. भारताकडे १४४ धावांची आघाडी असून रवींद्र जडेजासह अक्षर पटेल खेळपट्टीवर तंबू ठोकून आहेत. आजच्या दिवसाचे वर्णन करायचे झाल्यास ‘रोहितने रचला पाया, जडेजा-अक्षर झालासे कळस’ असे म्हणता येईल. दिवसभराचा खेळ पाहता कांगारूंना नाकेनऊ आणले असेच म्हणता येईल.

भारतीय संघाने क्रिकेटला एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूचाही समावेश आहे. रोहित सध्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. ही जबाबदारी पार पाडत असताना तो संघाला विजय मिळवून देण्यासोबतच विक्रमांचा घाटही घालताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहितने दमदार कामगिरी केलीये. त्यामुळे त्याच्यासाठी ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’ हा शब्दप्रयोग केला, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याने यादरम्यान एक शतक झळकावत एक खास विक्रम स्वत:च्या नावावर रचला आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर रोहित भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. तो दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत टिकला. मात्र, पॅट कमिन्सच्या ८१व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याला बाद व्हावे लागले. यावेळी रोहितने २१२ चेंडूंचा सामना करत १२० धावा चोपल्या. या धावा त्याने २ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने चोपल्या. हे शतक करताच रोहित विक्रमवीर बनला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

भारतीय संघाने सात गडी गमावून ३२१ धावा केल्या आहेत. चहापानानंतर भारताला मोठा धक्का बसला. रोहित २१२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकार खेचून १२० धावांवर बाद झाला. पॅट कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. मर्फीने पदार्पणवीर केएस भरतची ( ८) विकेट घेतली आणि पदार्पणात डावात पाच विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा फिरकीपटू ठरला. २००८मध्ये जेसन क्रेझाने ८/२१५ ( वि. भारत) आणि नॅथन लियॉनने २०११मध्ये ५/३४ ( वि. श्रीलंका) अशी कामगिरी केली होती. अक्षर पटेल ५२ आणि रवींद्र जडेजा ६६ धावांवर खेळत आहे. पहिल्या डावाच्या आधारे भारताला १४४ धावांची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाच्या अजून तीन विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत भारताला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारायची आहे, जेणेकरून सामन्याच्या चौथ्या डावात फलंदाजी करावी लागणार नाही.

हेही वाचा: Murali Vijay: “दक्षिणात्यांचे कौतुक करताना जीभ…”, माजी मुंबईकर खेळाडूच्या ‘या’ प्रतिक्रियेवर मुरली विजयचा हल्लाबोल

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. ४९ धावा करणारा मार्नस लाबुशेन संघाचा सर्वोत्कृष्ट स्कोअरर ठरला. स्टीव्ह स्मिथने ३७ आणि अ‍ॅलेक्स कॅरीने ३६ धावा केल्या. भारताकडून जडेजाने पाच आणि अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने सात गडी गमावून ३२१ धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्मा १२० धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल अर्धशतकांसह खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने पाच बळी घेतले असले तरी भारताकडे १४४ धावांची आघाडी आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आणखी ५० धावा केल्या तर टीम इंडिया सहज सामना जिंकू शकेल.