IND vs AUS Delhi Test: नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा फिट झालेल्या श्रेयस अय्यरचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे अय्यरला न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या नागपुरातील सलामीच्या सामन्याला मुकावे लागले. परंतु बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये काही दिवस सराव केल्यानंतर, उजव्या हाताच्या फलंदाजाने मधल्या फळीतील आपले स्थान परत मिळविण्यासाठी स्वत:ला सेट केले आहे. याचा अर्थ नागपूर कसोटीत पदार्पण करणाऱ्या आणि आठ धावांवर बाद झालेल्या सूर्यकुमार यादवला बाहेर पडावे लागणार आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, “संघातील परिस्थिती प्रत्येकाला समजते. अय्यरने बुधवारी भारताच्या पहिल्या पूर्ण सरावात बरेच तास फलंदाजी केली.” द्रविड पुढे म्हणाला की “अय्यर गुरुवारी पुन्हा फलंदाजी करेल आणि संघ व्यवस्थापनाला वाटत असेल की तो पाच दिवसांचा भार उचलण्यास तयार आहे, तर त्याला अंतिम अकरामध्ये लगेच संधी मिळेल.”
द्रविडने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “कुणीतरी दुखापतीतून परत येणे नेहमीच चांगले असते. दुखापतीमुळे खेळाडूंना गमावणे आम्हाला कधीच आवडत नाही. हे एक संघ म्हणून आमच्यासाठी तसेच त्या खेळाडूसाठी चांगले नाही. तो (श्रेयस) परत आला आहे आणि तंदुरुस्त आहे याचा मला आनंद आहे. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आम्ही ते नक्की विचारात घेऊ. आज त्याचे सत्र खूप लांबले आहे, त्याने काही प्रशिक्षण घेतले आहे. तो एकदा नॉर्मल रुटीनला आला की आम्ही त्याचे मूल्यांकन करू आणि ते कसे होते ते पाहू. तो फिट आणि तयार असेल आणि कसोटी सामन्याच्या पाच दिवसांचा भार उचलू शकत असेल, तर त्याच्या मागील कामगिरीबद्दल शंका न घेता, तो थेट अंतिम अकरामध्ये जाईल.”
अय्यर गेल्या दीड वर्षात एकदिवसीय आणि कसोटीत भारताच्या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून, त्याने या स्तरावर प्रशंसनीय धैर्य दाखवले आहे. अय्यर पदार्पणापासूनच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. ७ कसोटीत ५६ च्या सरासरीने त्याच्या ६२४ धावा केल्या आहेत. तर प्रथम क्रमांकावर ऋषभ पंतच्या ८ सामन्यातील केलेल्या ७२२ धावा आहेत.
द्रविडच्या मते फिरकीपटूंविरुद्ध अय्यरने सर्वाधिक प्रभावित केले आहे त्यामुळे तो मधल्या फळीतील निश्चित दावेदार बनला आहे. याविषयी बोलताना तो पुढे म्हणतो, “होय, श्रेयसने फिरकीविरुद्ध चांगला खेळ केला आहे. श्रेयसच्या कानपूरमधील पदार्पणाच्या सामन्यापासूनच आम्ही अनेक दबावाच्या परिस्थितीत होतो. गेल्या दीड वर्षात तो, जडेजा आणि ऋषभ यांनी त्या गंभीर परिस्थितीत चांगल्या खेळी खेळून आम्हाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. बांगलादेशात जेव्हा आम्ही दबावाखालीखाली होतो तेव्हा त्याची उत्तम खेळी खरोखरच एक चांगला संकेत होती.”
सूर्यकुमार यादवच्या स्थानाबद्दल विचारले असता, राहुल द्रविडच्या मते सध्याचे संघ व्यवस्थापन भारतासाठी सामने जिंकलेल्या कामगिरीचे महत्त्व देतात आणि जेव्हा ते दुखापतीतून पुनरागमन करतात तेव्हा त्यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल. याबाबत बोलताना तो म्हणतो, “ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांच्या योगदानाची आम्ही कदर करतो. जर ते दुखापतींमुळे वगळले गेले असतील, तर त्या काळात काय झाले याची पर्वा न करता त्यांना पुनरागमन करण्याचा अधिकार आहे.”