ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपवून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत आटोपल्यानंतर टीम इंडियाने ४ गडी गमावून ११५ धावांचे लक्ष्य गाठले. विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने जडेजा आणि अश्विन जोडीच्या गोलंदाजीचे कौतुक केले. त्याचवेळी त्याने विराट कोहलीच्या फलंदाजीवरही भाष्य केले.
खेळपट्टीबाबत रोहित शर्माची प्रतिक्रिया –
रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले की, ”हा आमच्यासाठी खूप मोठा निकाल आहे. कालचा दिवस ज्या प्रकारे संपला त्यानंतर अशी कामगिरी कौतुकास्पद आहे. पहिल्या डावाच्या धावसंख्येपासून आम्ही १ धावांनी मागे असलो तरी या खेळपट्टीवर आम्हाला शेवटी फलंदाजी करावी लागली. माझ्या मते गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. केवळ एका सत्रात ९ विकेट्स मिळवणे विलक्षण आहे. आणि त्यानंतर आम्ही फलंदाजी करताना सामना चांगल्या प्रकारे संपवला.”
रोहित पुढे म्हणाला की, “अशा खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला वेगळा विचार करावा लागतो. आम्ही त्यासाठी तयार होतो आणि त्यानुसार आमचे शॉट्स खेळले. आम्हाला अजिबात अडचणीत पडायचे नव्हते आणि आम्ही सतत योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही फक्त फलंदाजाची चूक होण्याची वाट पाहत होतो आणि ते घडले. जेव्हा जेव्हा आपण अशा वातावरणात खेळतो, तेव्हा गोलंदाजांसाठी खेळपट्टीवर काहीतरी नक्कीच असते. आमच्या लक्षात आले की पहिल्या सत्रात फलंदाजी थोडी अवघड असते, पण उरलेल्या २ सत्रात ती खूप संथ विकेट बनते.”
रोहित शर्माने या खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय –
त्याचवेळी, रोहितने कोहली आणि जडेजा यांच्यातील भागीदारीवर देखील भाष्य केले. त्याने सांगितले की, ”मला वाटते की आमच्या पहिल्या डावात जडेजा आणि विराट यांच्यातील भागीदारीमुळे आम्हाला या सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अक्षर आणि अश्विनने ज्या प्रकारे शानदार फलंदाजी केली. त्याने आम्हाला पूर्णपणे फलंदाजीत परत आणले. मला वाटते की या मालिकेतील आमच्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात सकारात्मक बाजू आहे. जडेजा आणि अश्विन अशा परिस्थितीत गोलंदाजी करण्यात पारंगत आहेत. त्यांचा सामना करणे अजिबात सोपे काम नाही.”
भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल टाकले –
ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये, आपले स्थान निश्चित करण्यासाठी किमान ३ सामने जिंकणे आवश्यक होते. मालिकेतील पहिले २ कसोटी सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडियाने फायनलसाठीही आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे, जर कांगारू संघ या कसोटी मालिकेतील उर्वरित २ पैकी १ सामना जिंकू शकला नाही, तर त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करणे कठीण होऊ शकते. त्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.