India vs Australia: शुक्रवारपासून (दि. १७ फेब्रुवारी) दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचे अनेक खेळाडू चमकले. चेतेश्वर पुजारा याने सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. तो १००वा कसोटी सामना खेळणारा भारताचा १३वा खेळाडू बनला. यानंतर आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. या यादीत आता रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश झाला. त्याच्याच जोडीला अश्विन, शमी यांनी त्याला साथ देत ऑस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी बाद करण्यात महत्वाची भूमिका निभावली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. सकाळी कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या डावाची सुरुवात दमदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान खाव्जा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र १५ धावा करून वॉर्नर बाद झाला. उस्मान ख्वाजाने एक बाजू लावून धरली. अश्विनने एकाच षटकात आयसीसी क्रमवारीतील प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाना बाद केले. मार्नस लाबुशेनने १८ धावा तर स्टीव्ह स्मिथला भोपळाही फोडता आला नाही.
शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या उस्मान ख्वाजाचा केएल राहुलने अफलातून झेल घेतला आणि ८१ धावांवर त्याला बाद केले. त्यानंतर पीटर हँड्सकॉम्बने नाबाद ७२ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्याला कर्णधार पॅट कमिन्सने ३३ धावा करत साथ दिली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू जोडी जडेजा-अश्विनने प्रत्येकी ३ गडी बाद केले. दिवस संपायला अजून वेळ असल्याने टीम इंडिया फलंदाजीला येणार असून किमान चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे.
रवींद्र जडेजाचा विक्रम
यासह जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो कसोटी कारकीर्दीत २५० विकेट्सचा टप्पा पार करणारा खेळाडू बनला. विशेष म्हणजे, जडेजा याने ही कामगिरी ६२ कसोटी सामन्यातील ११७ डावात २.४४च्या इकॉनॉमी रेटने २५० विकेट्स चटकावल्या. तो कसोटीत भारताकडून २५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा ८वा गोलंदाज ठरला. लान्स गिब्स, क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रेट ली यांनीदेखील जडेजाइतक्याच ६२ कसोटी सामन्यांमध्ये २५० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.