ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने यजमानांवर ३१ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांत आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे कांगारुंची झुंज अपयशी ठरली आणि भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

या सामन्यात अनेक विक्रम झाले. त्यातील एक महत्वाचा विक्रम म्हणजे या सामन्यात ४० पैकी ३५ बळी हे झेलबाद झाले. एखाद्या कसोटी सामन्यात सर्वाधिक फलंदाज झेलबाद होण्याचा हा विश्वविक्रम ठरला. या आधी २०१८मध्येच केप टाऊनला झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात एकूण ३४ फलंदाज झेलबाद झाले होते. तर १९९२ साली पर्थवर झालेल्या भारत – ऑस्ट्रेलिया सामन्यात ३३ फलंदाज झेलबाद झाले होते.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून अर्धशतकी खेळी करून शॉन मार्श (६०) माघारी परतला. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. टीम पेनला (४१) बुमराहने माघारी धाडले. शमीने स्टार्कला (२८) तंबूचा रस्ता दाखवला. दीर्घकाळ खेळपट्टीवर तग धरून खेळणाऱ्या पॅट कमिन्सची झुंज अखेर अपयशी ठरली. १२१ चेंडूत २८ करून तो बाद झाला. बुमराहने त्याचा अडसर दूर केला. अखेर अश्विनने हेजलवूडला माघारी धाडत भारताला सामना जिंकवून दिला.

Story img Loader