India vs Australia ODI 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळला जात आहे. भारताने यापूर्वीचे दोन्ही सामने वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना जिंकले होते. गेल्या दोन सामन्यात के.एल. राहुल कर्णधार होता. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार पहिला वन डे पाच गडी राखून आणि दुसरा एकदिवसीय सामना ९९ धावांनी जिंकला. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघ ऑस्ट्रेलियालाविरुद्ध निर्भेळ यश संपादन करू इच्छितो. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव पुनरागमन करत आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कमिन्सने प्लेइंग-११मध्ये पाच बदल केले आहेत. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. तर, तनवीर संगा वन डेमध्ये पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-११ मध्ये बरेच बदल केले आहेत. रोहित स्वतः, कुलदीप आणि विराट संघात पुनरागमन करत आहेत. त्याचवेळी शुबमन, शार्दुल, अश्विन आणि इशान खेळत नाहीत. अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर ऑफस्पिनरची भूमिका निभावणार आहे.
गिलला विश्रांती दिली, पांड्या-शमी आणि ठाकूर घरी परतले
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, तिसऱ्या वन डेत पाच खेळाडू शेवटच्या सामन्यात खेळणार नाहीत. तो म्हणाला की, “शुबमन गिलला आजारपणामुळे विश्रांती देण्यात आली आहे. अनेक खेळाडूंच्या वैयक्तिक समस्या आहेत. केवळ १३ खेळाडूंमधून अंतिम अकराची निवड केली जाईल. आशिया कप दरम्यान झालेल्या दुखापतीतून अक्षर पटेल सावरला नाही, तो सध्या एनसीएमध्ये उपचार घेत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या आपापल्या घरी परतले आहेत. हार्दिक या सामन्यात परतणार होता, मात्र त्याला घरगुती कारणासाठी तात्काळ जावे लागले. अक्षरही या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही.
पहिल्या दोन वन डेत रोहित, कोहली आणि कुलदीप खेळले नव्हते. तिसऱ्या वन डेसाठी हे सर्व उपलब्ध आहेत. रोहितने यावेळी सामन्यात परतणे चांगले असल्याचे सांगितले. विश्वचषकापूर्वी संघातील प्रत्येक खेळाडू फ्रेश राहावा अशी आमची इच्छा आहे. अश्विनबाबत रोहित म्हणाला की, “अश्विनने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दाखविलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळू शकते. त्याला क्रिकेटचा खूप जास्त अनुभव आहे आणि तो दबावाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळतो. अश्विनचे दीर्घ कालावधीनंतर वन डेमध्ये पुनरागमन झाले आहे.”
बीसीसीआयने दिली मोठी माहिती
बीसीसीआयने ट्वीटरवर म्हटले आहे की, “धर्मेंद्र जडेजा, प्रेरक मंकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई हे चार स्थानिक खेळाडू संपूर्ण सामन्यादरम्यान पाणी, कोल्ड्रिंक आणि क्षेत्ररक्षणासाठी संघाबरोबर राहतील.
दोन्ही संघाची प्लेईंग-११ पुढीलप्रमाणे
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.