IND vs AUS 3rd Test Updates: इंदोर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ गडी राखून पराभव केला. या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर हतबल दिसत होते. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. या दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मोठे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे रहस्यही त्याने सांगितले आहे.
इंदूर कसोटी जिंकल्यानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया –
इंदोरमधील मोठ्या विजयाबद्दल बोलताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “पहिल्या दिवशी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली, आमच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि भारतावर दबाव आणला. मॅथ्यू कुहनेमनने पहिल्या दिवशी खरोखरच शानदार गोलंदाजी केली, असे मला वाटते. आमच्या सर्व गोलंदाजांनी भागीदारीमध्ये योगदान दिले आणि गोलंदाजी केली. उस्मानने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. ते या मालिकेत आमच्यासाठी खरोखर खूप चांगले राहिले.”
स्मिथने विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले –
इंदोर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या ११ धावांत ६ विकेट्स घेत भारताने सामन्यात पुनरागमन केले होते. यावर स्मिथ म्हणाला की, “भारताने काल शानदार पुनरागमन केले होते. त्यामुळे मला वाटले की आम्हाला खूप मेहनत करावी लागेल. पुजाराने शानदार खेळी खेळली पण आम्ही खरोखरच टिकून राहिलो. नॅथनने ८ विकेट घेऊन सर्व पुरस्कार मिळवले, पण मला वाटते की एकत्रितपणे आमच्या गोलंदाजांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. ते एक सांघिक परिपूर्ण कामगिरी होती.”
इंदोर कसोटी सामन्याची संपूर्ण स्थिती –
इंदोर कसोटीला १ मार्चपासून सुरुवात झाली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९७ धावा केल्या आणि ८८ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात केवळ १६३ धावा करता आल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे कांगारू संघाने १ विकेट्स गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने दुसऱ्या डावात ८ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात ३ विकेट्सही घेतल्या होत्या. अशा प्रकारे त्याने तिसऱ्या कसोटीत एकूण ११ विकेट घेतल्या.