India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मात्र २-१ने टीम इंडिया अजूनही पुढे आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसले. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या ७६ धावांची आवश्यकता होती आणि ती एका गड्याच्या मोबदल्यात पार केली.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नॅथन लायन याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांवर संपुष्टात आला. लायनने भारताचे ८ गडी बाद केले. सामना संपण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना तिसऱ्याच दिवशी पाहुण्या संघाने यजमानांना पराभूत केले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी कमी धावांचे आव्हान असले तरी, भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव याला विजयाची आशा व्यक्त केली होती ती फोल ठरली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. धावांचा पाठलाग करताना उस्मान खाव्जाला भोपळाही फोडता आला नाही. शून्य धावांवरच कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर उंदरा-मांजराचा खेळ काही काळ सुरु राहिला. मात्र मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड यांनी आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली आणि लाबुशेनने विजयी चौकार मारून भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवले. लाबुशेन आणि हेड यांनी अनुक्रमे २८ आणि ४९ धावा करून ते नाबाद राहिले. केवळ अश्विनला १ गडी बाद करता आला.
तत्पूर्वी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर अक्षरशः लोटांगण घातले. विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून ‘मिस्टर डिपेंडंट’ अशी ओळख असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक करत ५९ धावा केल्या. त्याचा स्टीव्ह स्मिथने शानदार झेल घेतला आणि टीम इंडियाची शेवटची आशा देखील मावळली. नॅथन लायनने ८ विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियन संघाने इंदोर कसोटीत चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा पाहुण्या संघाच्या विकेट्स झटपट घेतल्या. उभय संघांतील बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा हा तिसरा सामना असून ऑस्ट्रेलियाने ८८ धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या १०९ धावांवर गुंडाळला गेल्यानंतर ऑस्ट्रेलिया मोठी आघाडी मिळण्याची शक्यता होती. पण उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या त्रिकूटाने ऑस्ट्रेलियाला १९७ धावांवर रोखले. यादव आणि अश्विनने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या, तर जडेजाने सर्वाधिक चार विकेट्स नावावर केल्या.