India vs Australia 3rd Test Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग-११ मध्ये कर्णधाराने दोन बदल केले आहेत. केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे. राहुलच्या जागी शुबमन गिल आणि शमीच्या जागी उमेश यादवला खेळण्याची संधी मिळाली. त्याचवेळी पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषवत असलेल्या स्टीव्ह स्मिथनेही प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर एकतर्फी हुकूमत गाजवत प्रत्येकी तीन दिवसात दोन्ही सामन्यांचा निकाल लावला. तिसरी कसोटी जिंकून जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी पोहोचू शकतो. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारतीय संघाची जागा देखील पक्की होईल. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने दोन बदल केले.
इंदोर येथील सामन्यात भारतीय संघात शुबमन गिल व उमेश यादव यांना संघात संधी मिळाली आहे. गिल खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुल याच्या जागी सलामीला फलंदाजी करेन. राहुल मागील बऱ्याच कालावधीपासून सातत्याने अपयशी ठरत असून त्यावर चोहीकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही त्याला आपली छाप पाडण्यात यश आले नाही. तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी उमेश यादव संघात खेळताना दिसू शकतो. शमी याला वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी विश्रांती देण्यात आलीआहे. शमीने पहिल्या दोन सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली होती. गिल व उमेश आपला अखेरचा कसोटी सामना बांगलादेश दौऱ्यावर खेळले होते.
या फॉरमॅटमधील दोन्ही देशांमधील आकडेवारीबद्दल बोलायचे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया १०४ कसोटी सामने आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने ३२ आणि ऑस्ट्रेलियाने ४३ सामने जिंकले. एक सामना टाय झाला असून २८ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतात ५२ कसोटी सामने दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने २३ आणि ऑस्ट्रेलियाने १३ सामने जिंकले. १५ कसोटी अनिर्णित राहिल्या आणि एक सामना बरोबरीत राहिला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच भिडणार आहेत.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव व मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ
ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनमन.