IND vs AUS 3rd Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात इंदोरमध्ये खेळली जाणारी तिसरी कसोटी शुक्रवारी पार पडली. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ९ विकेट्सने जिंकला. त्यामुळे कांगारु संघाने ७६ धावांचा पाठलाग करताना १८.५ षटकांत १ बाद ७८ धावा केल्या. या कसोटीचा निकाल देखील मागील दोन सामन्याप्रमाणे तीन दिवसातच लागला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्क वॉने विराटबद्दल एक विधान केले आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ संपणार असल्याची सतत चर्चा होती. विराट कोहलीच्या बॅटमधून शेवटचे कसोटी शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये झळकले होते. त्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्क वॉ विराटने इतके दिवस कसोटी शतक झळकावले नाही हे पाहून आश्चर्यचकित झाला आहे. या मालिकेत विराटने चांगली फलंदाजी केली, पण तरीही शतक झळकावता आले नाही, असे मार्क वॉ म्हणाला.
फॉक्स क्रिकेटवर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ म्हणाला, “माझा विश्वास बसत नाही की अशा दर्जाचा विराट कोहली इतके दिवस कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावू शकला नाही. अलीकडच्या काळात तो एकदिवसीय सामन्यांमध्ये खूप चांगला फॉर्ममध्ये दिसला होता.”
तो पुढे म्हणाला, “त्याच्या बॅटच्या मधोमध चेंडू लागत आहे. शेवटच्या तीन डावांत तो खरोखर चांगला खेळत असल्याचे सूचित केले आहे. त्याचा बचाव खूप मजबूत आहे. मला वाटते त्याचे नशीब त्याला साथ देत नाही. त्यामुळे तो एक चूक करतो आणि बाद होतो.”
ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र –
इंदोर कसोटी अडीच दिवसांत जिंकून ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. टीम इंडियासाठी आता कोणत्याही परिस्थितीत चौथ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. कांगारूंनी प्रथमच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सामन्याबद्ल बोलायचे, तर भारतीय संघाने पहिल्या डावात १०९ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या आणि ८८ धावांची आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात १६३ धावा केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघासमोर ७६ धावांचे लक्ष्य ठेवले. जे ऑस्ट्रेलिया संघाने १८.५ षटकांत १ बाद ७८ धावा काढत पूर्ण केले.