India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदोर कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर अक्षरशः लोटांगण घातले. विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून ‘मिस्टर डिपेंडंट’ अशी ओळख असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक करत ५९ धावा केल्या. त्याचा स्टीव्ह स्मिथने शानदार झेल घेतला आणि टीम इंडियाची शेवटची आशा देखील मावळली. नॅथन लायनने ८ विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. पाचव्या षटकात शुबमन गिल (५) लायनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लायनने १५व्या षटकात रोहितला (१२) पायचीत केले. चेतेश्वर पुजारा एका बाजूने चांगला खेळ करताना दिसला. विराट कोहली त्याला साथ देईल असे आशादयक चित्र दिसत असताना किंग कोहली चुकीचा फटका मारायला गेला. मॅथ्यू कुहनेमनने त्याला (१३) पायचीत केले.
लायनने तिसरा धक्का देताना रवींद्र जडेजाला (७) पायचीत केले. पुजारा एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता आणि श्रेयस अय्यर आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३ चौकार व २ खणखणीत षटकार खेचून २७ चेंडूंत २६ धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजावीर त्याने टोलावलेला चेंडू उस्मान ख्वाजाने डाईव्ह मारून टीपला. त्यानंतर लायनने भारताला आणखी एक धक्का देताना केएस भरतचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर. अश्विनने १६ तर उमेश यादव भोपळाही फोडू शकला नाही. भारताकडून पुजाराने सर्वाधिक ५९ धावा करत १५०चा टप्पा पार करून दिला. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे (१५) आणि (०) धावा केल्या. भारताचा डाव हा १६३ धावांवर आटोपला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने इंदोर कसोटीत चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा पाहुण्या संघाच्या विकेट्स झटपट घेतल्या. उभय संघांतील बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा हा तिसरा सामना असून ऑस्ट्रेलियाने ८८ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या १०९ धावांवर गुंडाळला गेल्यानंतर ऑस्ट्रेलिया मोठी आघाडी मिळण्याची शक्यता होती. पण उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या त्रिकूटाने ऑस्ट्रेलियाला १९७ धावांवर रोखले. यादव आणि अश्विनने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या, तर जडेजाने सर्वाधिक चार विकेट्स नावावर केल्या.