भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांच्या नजरा मालिकेत आघाडी मिळवण्यावर असतील. भारताने पर्थमध्ये खेळला गेलेला पहिला सामना २९५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली, मात्र, ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारताचा १० गडी राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस व्यत्यय घालणार असल्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे आणि सामन्याच्या पाचही दिवस पावसाची शक्यता आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या आणि चौथ्या दिवशीही पावसाची ४० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. उर्वरित तिसऱ्या आणि पाचव्या दिवसांचा अंदाज चांगला आहे, ज्यामध्ये सुमारे २० टक्के पाऊस पडू शकतो, ज्याचा खेळावर फारसा परिणाम होणार नाही.

हेही वाचा – SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

आता मोठा प्रश्न हा आहे की जर पावसामुळे गाबा कसोटी अनिर्णित राहिली तर त्याचा भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीवर काय परिणाम होईल.

टीम इंडिया WTC फायनल समीकरण

टीम इंडिया सध्या ५७.२९ टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आहेत ज्यांचे गुण अनुक्रमे ६३.३३ आणि ६०.७१ टक्के आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरीही भारत WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताने पुढील दोन सामने जिंकून मालिका ३-१ ने जिंकली, तर त्यांना अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळेल.

हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज

गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, भारताने पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक गमावला, तर मालिका २-२ अशी संपेल. या स्थितीत टीम इंडियाला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेच्या संघाने ती मालिका १-० किंवा २-० ने जिंकावी अशी भारताला प्रार्थना करावी लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd test rain to play spoilsport in brisbane weather update what will be india wtc qualification chances if match abandoned bdg