– नामदेव कुंभार

२००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘३००’ हा हॉलिवूडपट खूप गाजला होता. आजही हा चित्रपट पाहिल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात. तीनशे स्पार्टन ज्या पद्धतीनं स्वत: आणि देशाच्या आत्मसन्मानासाठी लढतात हे पाहून आजही अनेकांची छाती नक्कीच फुलते… असंख्य अडचणी आल्यानंतरही पराभव न मानता तितक्याच त्वेषानं स्पार्टन प्रतिकार करतात आणि समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करतात. असाच पराक्रम ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघानं केलाय म्हटलं तर वावगं वाटायला नको. दुखापत, वर्णद्वेषी, स्लेजिंग आणि टीकेचा सामना करत भारतीय संघ हिमतीनं आणि जिगरबाजपणे लढत आहे. आजच्या भारतीय संघाच्या एकजूट, जिद्द आणि लढाऊ वृत्तीला पाहून त्या ३०० स्पार्टनची आठवण येतेय.

ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे. नसेल तर त्या आकडेवारीवर नजर फिरवल्यास तुम्हाला सध्याच्या भारतीय संघाच्या कामगिरीवर नक्कीच गर्व होईल. २०१० च्या आधी कसोटी वाचवण्यासाठी झगडणारा भारतीय संघ आता विजयासाठी लढतोय… तेही दुखापतग्रस्त खेळाडू असताना. ही अभिमानाची आणि गर्वाचीच गोष्ट आहे. संघातील महत्वाचे नऊ योद्धे दुखापतग्रस्त झाले असतानाही भारतानं मनोबल घटवलं नाही, उलट तितक्याच हिमतीनं ऑस्ट्रेलियाला प्रत्त्युत्तर दिलं आहे. ४०७ धावांचं आभाळाएवढं आव्हान पाहून तिसरा कसोटी सामना भारत हारणार असेच प्रत्येकाला वाटतं होतं. पाँटिंग गुरुजींनी तर भारताला चौथ्या डावांत २०० धावाही करता येणार नाही असं भाकित केलं होतं. त्यातच वर्णद्वेषीचं गालबोट आणि स्लेजिंग असा दुहेरी मार दुखापतीच्या खिंडीत अडकलेल्या भारतीय संघाविरोधात झाला होता. पण इतक्यात भारतीय संघ खचला नाही स्पार्टनप्रमाणे एकजूट होत त्वेषानं प्रतिकार केला. (कदाचीत ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी ३०० हा चित्रपट पाहिला असवा.) जसं की त्यांनी आधीच ठरवलं होतं पराभव पाहायचाच नाही.  कुसुमाग्रजांच्या  ‘मोडून पडला कणा’ या कवितेतील नायकाप्रमाणे भारतीय संघही दुखापतीनंतरही उभा राहिला आणि शेवटपर्यंत लढलाही.

२०१८ मध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात विजय मिळवला तेव्हा अनेक अतिउत्साही क्रीडा प्रेमींना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या आघाडीच्या खेळाडूच्या अनुपस्थितीला हा विजय तितका महत्वाचा नसल्याचं अतिउत्साही वक्तव्य केलं. आता त्यांना कोण सांगणार विजय हा विजयच असतो. बरं ते अतिउत्साही क्रीडा प्रेमी आता कुठे जाऊन बसलेत. आज भारतीय संघात आघाडीचे खेळाडू नाहीत, जे आहेत त्यातही काही दुखापतग्रस्त आहे. अशा परिस्थितीतही भारतीय संघानं कांगारुंच्या नाकी नऊ आणलं आहे. (खेळाडू दुखापतग्रस्त नसते तर कदाचीत तिसऱ्या सामन्याचा निकाल वेगळा लागला आसता) विराट कोहली, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि के. एल राहुलसारखे पहिल्या फळीतील खेळाडू नसतानाही भारतीय संघानं केलेला संघर्ष खरंचं कौतुकास्पद आहे. स्मिथ-वॉर्नर नसल्याची कारणं देणाऱ्यांनी आतातरी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करावं, ही मनस्वी इच्छा आहे.

चौथ्या कसोटीत भारतापुढील आव्हानं आणखीनच कठीण आहेत. कारण दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये जाडेजा, बुमराह आणि हनुमा विहारी यांची भर पडली आहे. त्यात अश्विन आणि मयांक अग्रवाल यांच्या खेळण्यावरही संभ्रम आहे. ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघातील इतके खेळाडू दुखापतग्रस्त झालेत की चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी अंतिम ११ खेळाडूच नाहीत. अशा परिस्थितीतही भारतीय संघानं केलेली कामगिरी विसरता येणार नाही. त्यांची लढाऊ वृत्ती खरंच कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. इतर संघ अडचणीत आणि कठीण प्रसंगात असताना या भारतीय संघाचा नक्कीच आदर्श घेतील अशी कामगिरी अंजिक्य रहाणे आणि कंपनीनं करुन दाखवली आहे. अंजिक्य राहणेच्या नेतृत्वात भारतीय संघ त्या ३०० स्पार्टनसारखं देशासाठी, आत्मसन्मानासाठी ऑस्ट्रेलियात लढला आणि लढतही आहे. शेवटी एकच सांगेन बॉर्डर-गावसकर मालिकेचा निकाल कोणताही लागो… आम्ही तुमच्यासोबत आहोत. ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यासाठी रहाणे आणि कंपनीला खूप साऱ्या शुभेच्छा…!

(namdeo.kumbhar@loksatta.com)

Story img Loader