India vs Australia 3rd Test Updates: इंदोर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव लवकर आटोपला होता. यानंतर क्रिकेटपंडित आणि माजी क्रिकेटपटू आपापली मते मांडण्यात व्यस्त आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू इयान चॅपेलचे वक्तव्यही समोर आले आहे. यादरम्यान चॅपलने आपला राग श्रेयस अय्यरवर काढला आहे. तो म्हणाला, ‘श्रेयस हा फिरकीचा चांगला खेळाडू असल्याचे मी ऐकले होते, पण मला तसे वाटत नाही. तो घाबरलेला दिसतोय.’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यर खाते न उघडता मॅथ्यू कुहनेमनचा बळी ठरला.
ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना चॅपेल म्हणाला, “चेतेश्वर पुजारा खूप उड्या मारणारा खेळाडू आहे. मला वाटते की संपूर्ण मालिकेत तो खूप उड्या मारत आहे. श्रेयस अय्यर हा फिरकी गोलंदाजीचा खूप चांगला खेळाडू आहे, असे मी ऐकले होते, पण मी अजून ते पाहिले नाही. आता मला विश्वास बसत नाही की तो हा आहे. माझ्या दृष्टीने तो थोडा घाबरलेला दिसत आहे.”
तो पुढे म्हणाला, “भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी मला खात्री पटवून दिली नाही की, ते फिरकी गोलंदाजीचे चांगले खेळाडू आहेत. मला वाटले की ऑस्ट्रेलियन लोकांनी भारताला सुरुवातीपासून घाबरवले होते. खेळपट्टीसोबत काही गोष्टी घडल्या. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी अतिशय अचूक गोलंदाजी केली. पण भारतीयांनी ऑस्ट्रेलियनप्रमाणेच फलंदाजी केली हे आपण पाहिलं.”
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. भारताच्या उमेश यादव आणि आर. अश्विनने भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच १९७ धावांवर आटोपला. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने ८८ धावांची नाममात्र आघाडी घेता आली. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ६० धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी केवळ ११ धावांत ६ विकेट्स घेत कांगारूंना सळो की पळो करून सोडले.
हेही वाचा – WPL 2023: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्स आणि मिताली राजने धरला ठेका, पाहा मजेदार VIDEO
भारतीय डावाबद्दल बोलायचे तर इंदोरच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीने पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांना तारे दाखवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्माच्या ब्रिगेडला पहिल्या दिवशी ही खेळपट्टी इतकी वळण घेईल असे वाटले नव्हते. पहिल्या सत्रातच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघाचे ७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले, तर कांगारूंनीही दुसरे सत्र संपण्यापूर्वी संपूर्ण भारतीय डाव गुंडाळला होता. टीम इंडियासाठी कोहलीने सर्वाधिक २२ धावा केल्या, तर मॅथ्यू कुहनेमनने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करताना अवघ्या ९ षटकांत ५ बळी घेतले.